आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांसाठी पोहोचले 34 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- जून, जुलैतील अतिवृष्टीमुळे नुकसान झेलणार्‍या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाने सुमारे 34 कोटी रुपयांची मदत पाठवली. सोमवारी (दि. 18) या मदतीच्या वाटपाचे सूत्र ठरणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

उभ्या महाराष्ट्रात अवर्षणसदृश स्थिती असताना जून, जुलैत विदर्भात अतिवृष्टीचे वातावरण होते. त्यामुळे विदर्भातील विशेषत: अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सतत जोराचा पाऊस आणि कधी-कधी अतिवृष्टी यामुळे पिकांना मोठा फटका बसला. कृषी व महसूल यंत्रणा यांच्या संयुक्त सर्वेक्षणाअंती शासनाने या जिल्ह्यासाठी मदत मंजूर केली आहे. प्रारंभी मदतीची रक्कम कमी होती. त्यामुळे ती घोषित केली गेली नाही. दरम्यान, वाढीव रकमेसह ही मदत जिल्ह्यात पोहोचली असून ती लवकरच वितरित केली जाणार आहे.

कृषी, महसूलच्या वादाला मिळाला विराम
रकमेचे वाटप कृषी विभागाने करायचे की महसूल विभागाने, हा वादाचा मुद्दा बनला होता. मदतीची रक्कम कृषी व फळपिके घेणार्‍यांसाठी असल्याने तिचे वाटप कृषी विभागाने करावे, असे महसूल विभागाचे म्हणणे होते. दुसरीकडे वाटपाची सूत्रनिश्चिती व नेहमीची कार्यवाही महसूल विभागामार्फत होत असल्याने त्याच विभागाने वाटप करावे, असा युक्तिवाद कृषी विभागातर्फे केला जात होता. आता या बाबींना विराम मिळाला आहे.

शासनाकडे अधिकृत आकडा
मदतीची रक्कम लवकरच तालुकास्तरावर पोहोचवली जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष वाटप सुरू होईल. शेतकर्‍यांच्या नुकसानाची इत्थंभुत माहिती जिल्हा प्रशासनाने गोळा केली आहे. त्यामुळे कोणाचे किती नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा शासनाकडे आहे. शेती व फळपिकांचे 50 टक्क्य़ांपेक्षा जास्त नुकसान झेलणार्‍यांना ही मदत दिली जावी, असा शासनाचा आदेश आहे.

मदतीची रक्कम वाढवण्यात यश
जिल्ह्यातील काही आमदारांचा दबाब व त्याला अनुकूल असलेला अहवाल यामुळे मदतीचा आकडा वाढून 33 कोटी 72 लाख 83 हजारांवर पोहोचला. ही मदत लवकरच शेतकर्‍यांना दिली जाणार आहे.