आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये देशी कट्टय़ासह तिघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- चांदूररेल्वे येथील बायपास मार्गावरील बियर बारजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री संशयित कारमधून तिघांना अटक करून त्यांच्याकडून देशी कट्टा जप्त केला. देशी कट्टा पुरवणार्‍या आणखी दोघांना रविवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

टिंग्या ऊर्फ अनिस नूर मोहम्मद (24, डांगरीपुरा), नईमखान रहमान खान (26) आणि चंद्रशेखर संतोष मानकर (24, तिघेही रा. चांदूररेल्वे) असे अटक आरोपींची नावे आहेत. रविवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना बायपासवर मारुती 800 (क्रमांक एमएच 02/ के 7976) कार संशयास्पद अवस्थेत आढळली. त्यामध्ये कोणीही नव्हते. शोध घेतला असता, तिघेजण दबा धरून बसले होते. पोलिस दिसताच त्यांनी पळ काढला. त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून देशी कट्टा जप्त केला आहे. हे तिघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी टिंग्यावर दरोडा, घरफोडीचे गुन्हे, तर नईमखानवरही गुन्हे दाखल आहेत.

ते वाटमारी किंवा घरफोडीच्या उद्देशाने निघाले असावे, असा अंदाज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांना अटक करून चांदूररेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चांदूररेल्वे पोलिसांनी तिघांविरुद्ध वाटमारीचा प्रयत्न करणे, अवैध देशी कट्टा बाळगणे, या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. देशी कट्टा मिळाला, मात्र काडतूस न सापडल्याने काडतुसाचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक चांदूररेल्वेला रवाना झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मुकेश गावंडे, नीलेश सुरटकर, अरुण मेटे, मुलचंद भांबुरकर, त्र्यंबक मनोहरे, शकील चव्हान, दिलीप र्शीराव, दिनेश राठोड, आशीष इंगळे, सचिन मिर्शा यांनी ही कारवाई केली आहे.

आणखी दोघे ताब्यात; देशी कट्टा ग्वाल्हेरचा
संशयाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदूररेल्वे येथून रविवारी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी ग्वाल्हेर येथून कट्टा आणल्याचे पुढे आले आहे. त्या दोघांनीच टिंग्याला देशी कट्टा दिला असावा, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. अटक असलेल्या तिघांना न्यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. किरण वानखडे, सहायक पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.