आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 People Dead Due To Food Poising In Amrawati District

अमरावती जिल्हात ज्वारीचे पापड खाल्ल्याने विषबाधा; चौघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड (जि. अमरावती) - ज्वारीचे ओलसर पापड खाल्ल्यामुळे पाच जणांना विषबाधा झाली. त्यात एकाच कुटुंबातील चार जण दगावले, तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. अमरावती जिल्ह्यातील केदारखेड (ता. मोर्शी) येथे ही घटना घडली. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास चार जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सतीश रामभाऊ निहारी (२२), जय किशोर निहारी (३) पूर्वा प्रवीण निहारी (५), आदर्श अंबादास परसे (११) अशी मृतांची नावे आहेत, तर प्रिया अंबादास परसे (१२) हिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी निहारी कुटुंबातील रितेशने सकाळी घरी ज्वारीचे ओलसर पापड खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. दरम्यान, हिवरखेड येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले, परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी रितेशची प्राणज्योत मालवली. त्यामुळे निहारी कुटुंबाच्या सांत्वनासाठी मृत रितेशची खापरी (ता. काटोल) येथील मावशी, मावशीचे मुले आदर्श व प्रिया ही दोघे भावंडेही मंगळवारी केदारखेड येथे आली होती.

दरम्यान, मृत रितेशचा भाऊ सतीश, जय, आदर्श, पूर्वा व प्रिया या पाचही जणांनी बुधवारी वाळायला टाकलेले ज्वारीचे पापड खाल्ले. त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने पाचही जणांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तत्काळ अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री अकराच्या सुमारास जय किशोर निहारी व आदर्श अंबादास परसे यांचा मृत्यू झाला, तर सतीश नेहारे व पूर्वा निहारी यांची रात्री बारा वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यामुळे नातेवाइकांनी आक्रोश केला.
मंगळवारी रात्री एकापाठोपाठ चार जण दगावल्याने प्रिया अंबादास परसे हिला जिल्हा रुग्णालयातून बोंडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रितेशचाही विषबाधा झाल्यामुळेच मृत्यू झाला असावा, अशी चर्चा नागरिकांत होती. बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शोकाकूल वातावरणात मृतकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पापडाचे नमुने फॉरेन्सिककडे : विषबाधा झालेल्या ज्वारीच्या पापडांचे नमुने पोलिसांनी तपाणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत.

कुत्राही दगावला : मुलांनी ज्वारीचे पापड खाल्ले. त्यानंतर त्यांना काही वेळाने उलट्या झाल्या. ते कुत्र्याने खाल्ल्याने त्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. एवढेच नाही, तर त्या कुत्र्याच्या अंगावरचे पूर्ण केस गळाले होते, अशी चर्चा होती. त्याच पापडामुळे एक बकरीही आजारी पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.'
सांत्वनासाठी आले, प्राण गमावले
केदारखेड येथील निहारी कुटुंबातील रितेश (२५) या युवकाचा रविवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे निहारी कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बाहेरगावाहून नातेवाईक आलेले होते. त्यांच्यापैकीच पाच जणांना विषबाधा झाली. त्यापैकी चार जण दगावल्याची ही दुर्दैवी घटना घडली, तर दोन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकारामुळे केदारखेड या गावावरच शोककळा पसरली आहे.