आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवानांना 41 हजार राख्यांची भेट, 8 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- देशवासीयांच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर लढणार्‍या जवानांचे हात बळकट करण्यासाठी अमरावतीमधील बहिणींनी तब्बल 41 हजार राख्या देशाच्या सीमेवर मंगळवारी पाठविल्या आहेत. राख्या पाठविण्यापूर्वी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन येथील एन.सी.सी. भवनमध्ये करण्यात आले होते.

शहरातील क्लासिक क्रिएटिव्ह ग्रुप, अंबापेठ महिला मंडळ, अग्रवाल सखी मंच, ओसवाल बहू मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, जेसीआय अमरावती, लायन्स क्लब आणि सुतार समाज महिला मंडळातील महिला मागील आठ वर्षांपासून देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या पाठवितात.

याच संघटनांच्या महिलांनी यंदा तब्बल 41 हजार राख्या पाठविल्या आहेत. एन.सी.सी. भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी कर्नल व्ही. के. पोखरीयाल, कर्नल अजय कादीयान, कॅप्टन संतोष खत्री, सुभेदार मेजर अशोक कुमार आणि गोविंद कासट आदी हजर होते. सीमेवर असलेल्या जवानांवर अशा पद्धतीने प्रेम केल्यास त्यांना अधिक समाधान मिळते. कारण घर-संसार सोडून जवान सीमेवर देशाचे रक्षण करीत असतो; अशावेळी त्या जवानाला आपले सहकार्य आवश्यक आहे. ते सहकार्य इतक्या सकारात्मकरीत्या मिळाले तर जवानांनासुद्धा आनंदच होईल. अमरावतीसारख्या शहरातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर राख्या सीमेवर जात आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे कर्नल पोखरीयाल यांनी सांगितले.

शहरातील विविध महिला संघटना दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध शासकीय कार्यालये तसेच तुरुंगातील कैद्यांनासुद्धा राख्या बांधून त्यांच्या बंधुप्रेमाला उजाळा देतात.