आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसच्या खिडकीतून आरोपी पळाल्याप्रकरणी पाच पोलिस निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खून प्रकरणातील एका आरोपीला चांदूरबाजारवरून अमरावतीला घेऊन येत असताना तो पोलिसांना चकमा देऊन बसच्या खिडकीतून उडी टाकून पळाला. या प्रकरणी कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी शनिवारी पाच पोलिसांना तडकापडकी निलंबित केले आहे. यामध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

सहायक फौजदार विनोद काईंगे, गजानन धर्माळे, चंदकांत कोहळे, संतिमा पानझोडे आणि अनिता निखार असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सहदेव लालसिंग सावलकर (२४, रा. भैसदही बैतुल, मध्य प्रदेश) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची चौकशी िजल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गृह उपअधीक्षकांकडे सोपवली होती. चौकशी अहवाल प्राप्त होताच ही कारवाई करण्यात आली आहे.

सहदेवला शिरजगाव कसबा पोलिसांनी एका खुनाच्या आरोपाखाली तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने सहदेवला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे चांदूरबाजार न्यायालयातून त्याला २० नोव्हेंबर रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येत होते. या वेळी त्याच्यासोबत अन्य दोन आरोपी होते.
आरोपींना अमरावतीला घेऊन येण्यासाठी ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत सहायक फौजदार काइंगे अन्य चार कर्मचारी असे पाच जण होते. चांदूरबाजारवरून आरोपींना घेऊन निघालेले पोलिस महामंडळाच्या बसने (एमएच ४० एन ८६८२) येत होते. त्या वेळी सहदेव हा बसमध्ये खिडकी क्रमांक १९ जवळ बसला होता. अमरावती चांदूर बाजार मार्गावरील सालोरा गावानजीक बसची गती कमी झाल्याची संधी साधून सहदेवने चालू बसमधून थेट खिडकीतून खाली उडी मारून पळ काढला.
त्या वेळी हजर असलेल्या पोलिसांनी सहदेवचा बराच शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. अखेर पोलिसांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. त्याचा शोध घेण्यात आला मात्र, तो पोलिसांना सापडला नाही. आरोपीच्या शोधासाठी शिरजगाव कसबा पोलिसांनी पथकांची निर्मिती केली आहे.
सोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्या आरोपीचा शोध घेत आहे. मात्र, अजूनही तो मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सहदेव सावलकर याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पोहचले आहेत. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.