आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ाच्या 55 योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ग्रामीण भागात पिण्यायोग्य पाणी मिळावे म्हणून 10 कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठय़ाच्या 55 योजना साकारल्या जात आहेत. तूर्तास तीन कोटी रुपये प्राप्त झाले. या योजनांचे कार्यान्वयन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केले जात आहे.

वरुड तालुक्यातील आलोडा येथील योजना ग्रामीण पाणीपुरवठा समितीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने रखडली आहे. 90 टक्के सरकारी अनुदान, तर 10 टक्के लोकवर्गणी पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक आहे. आलोडा ग्रामपंचायतने लोकवर्गणी भरली नसल्याने 55 पैकी एकमेव योजना सुरू होऊ शकली नाही. पहिल्या, दुसर्‍या तसेच तिसर्‍या टप्प्यांची कामे या योजनेतून केली जात आहेत. ‘रेड झोन’मध्ये असलेल्या वरुड, मोश्री तसेच धारणी व चिखलदरा या डोंगरी तालुक्यांतील अधिकांश गावांचा योजनांमध्ये समावेश आहे. या पाणीपुरवठा योजनांमुळे 55 पेक्षा अधिक गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. सात सप्टेंबरला स्थायी समिती सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू राहण्याकरिता उर्वरित अनुदान मिळावे म्हणून प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्भव प्रमाणपत्र, सर्वेक्षण प्रमाणपत्र, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदाप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या 55 योजना आरंभ करण्यात आल्या.

तीन टप्प्यातील गावे
1 - गणोजा (ता. चांदूरबाजार), कोयलारी (ता. चिखलदरा), तळेगाव (ता. धामणगावरेल्वे), चेथर, खिडकी, पाटिया (ता. धारणी), अजितपूर भापकी, शहापूर, झोलंबा (वरुड).

2 - टोंगलाबाद, सोनारा खु. (ता. चांदूररेल्वे), राहू (ता. चिखलदरा), अंजनसिंगी, जळगाव मंगरुळ, निंभोरा बोडखा, दाभाडा (ता. धामणगाव रेल्वे), चटवाबोड, चेंडो, दाबका, उकुपाटी (ता. धारणी), भिवकुंडी, अडगाव, दहसूर, गणेशपूर (ता. मोश्री), बोर्डा, धामंत्री, दिवाणखेड, जावरा फत्तेपूर, जहागीरपूर, तिवसा (ता. तिवसा).

3 - मोथा (ता. चिखलदरा), बसपाणी, अंबाडी, बिजुधावडी, दादरा, दाराकोट, हातनदी, कासमार, काटकुंभ, केकदाबोड, खारी, कोठा, लाकटू, नाघूढाणा, सावर्‍या, शिवाझिरी (ता. धारणी), नेरपिंगळाई, निंभी (ता. मोश्री), कोव्हळा जटेश्वर (ता. नांदगाव खंडेश्वर), वर्‍हा (ता. तिवसा), खडका, मालखेड, पांढरी (ता. वरुड).