आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: ५६ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये झाली वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पुनर्मूल्यांकना नंतर५६ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ झाल्याचा प्रकार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात समोर आला आहे. गुणात वाढ झाल्याने आधी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे. गुणवाढ प्रकरण गाजत असताना मूल्यांकनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणे गंभीर आहे.

शिवाय विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील मूल्यांकन यंत्रणादेखील दोषपूर्ण असल्याचे समोर आले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून हिवाळी २०१४ मध्ये घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल घोषित केले जात आहे. टप्प्याटप्प्याने जाहीर होत असलेल्या निकालातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

विविध विषयांचे पुनर्मूल्यांकन हे परीक्षा विभागाच्या यंत्रणेतील एक प्रक्रिया आहे. मात्र, या यंत्रणेमध्ये बिघाड असण्याची दाट शक्यता आहे. विविध विषयांच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर तब्बल ७९३ विद्यार्थ्यांचे निकाल मंगळवारी एप्रिलला घोषित केले.
घोषित केलेल्या ७९३ पैकी तब्बल ४५० विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये पुनर्मूल्यांकनानंतर बदल झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये पुनर्मूल्यांकनानंतर वाढ होणे किंवा कपात होणे गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या गुणात कपात होणे किंवा वाढ झाल्याने केंद्रीय मूल्यांकन कक्षात उत्तरपत्रिकांचे व्यवस्थित मूल्यांकन होत नाही, यावर शिक्कामोर्तब होते.
एकदा केलेल्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनात चुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन कक्षात त्याबाबत दक्षता घेतली जात असेल, यात शंका नाही. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील केंद्रीय मूल्यांकन कक्षात विविध विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची जबाबदारी सेवानिवृत्त प्राध्यापकांवर सोपवली आहे.

संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षण देण्यात घालवलेल्या शिक्षकाकडून उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनात चुका होण्याची शक्यता तशी कमीच असते. मात्र, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत एकाच वेळी घोषित केलेल्या निकालात ५६ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फरक पडत असल्याने शंकेची पाल चुकचुकते.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात एका पाठोपाठ तीन ते चार गुणवाढ प्रकरणे उजेडात आली. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्यानंतर ही गुणवाढ केल्याचे विद्यापीठाच्या चौकशी अहवालात नमूद आहे. दरम्यान आधी दिलेल्या विविध विषयांच्या गुणांमध्ये वाढ करत विद्यार्थ्यांना पास करण्याची किमया संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात होत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.