आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात 60 हजार पोलिसांची भरती; पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राज्य पोलिसांत 61 हजार 324 कर्मचार्‍यांची लवकरच भरती करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आल्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी शनिवारी सांगितले. गृह विभागाने प्रस्तावास हिरवा कंदील दाखवला असून वित्त विभागासोबत बोलणी सुरू आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळल्यानंतर ही भरती प्रक्रिया पाच टप्प्यांत राबवण्यात येईल.

उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांनी अमरावती परिक्षेत्राची आढावा बैठक घेतली. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपिन बिहारी, पोलिस आयुक्त अजित पाटील, अमरावती परिक्षेत्रातील अमरावतीचे अधीक्षक विरेश प्रभू, यवतमाळचे अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अकोल्याचे अधीक्षक देवेंद्र मिर्श, बुलडाण्याचे अधीक्षक शामराव दिगावकर आणि वाशीमचे अधीक्षक सुधीर हिरेमठ आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

सप्टेंबरमध्ये 1600 फौजदार बाहेर पडतील : पोलिस दलात मनुष्यबळाची वानवा आहे. परिणामी सतत पदभरती सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात तब्बल 1600 फौजदार प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील. ही बॅच बाहेर निघाल्यानंतर दुसरी बॅच प्रशिक्षणासाठी जाईल. त्यांची निवड झाली आहे. फौजदारांसोबतच पोलिस उपअधीक्षक पदाचाही अनुशेष आहे. त्याअनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.

फौजदार होणे झाले सोपे
आतापर्यंत पोलिस दलात कार्यरत कर्मचार्‍याला फौजदाराची परीक्षा देण्यासाठी जमादार झाल्यावर पाच वर्षे सेवा अनिवार्य होती. मात्र, आता नियमांत बदल करण्यात आला असून दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचार्‍यास थेट फौजदाराची परीक्षा देता येईल.

80 टक्के कर्मचार्‍यांना घरे देण्याचे उद्दिष्ट
राज्यातील पोलिसांच्या शासकीय वसाहतीचा प्रश्न गंभीर आहे. सध्या केवळ 46 टक्के कर्मचार्‍यांनाच शासकीय घरे मिळाली आहेत. 46 पासून 80 टक्केवारी गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. हे लक्ष्य गाठण्यासाठी 68 हजारांपेक्षा अधिक घरे बांधणे गरजेचे आहे. यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची गरज असून, कोकण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.