आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६४ हजार शाळा नियमित मुख्याध्यापकाविना !, माहिती प्रणालीच्या अहवालातील वास्तव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘अारटीई’ कायद्यानुसार अाता शिक्षण सक्तीचे करण्यात अाले असले, तरी राज्यातील शाळांमध्ये शिक्षणासाठी फारशी अनुकूल स्थिती नसल्याचे वास्तव समाेर अाले अाहे. महाराष्ट्रातील तब्बल ६४ हजार ३६३ शाळांमध्ये नियमित मुख्याध्यापक, १६३ शाळांमध्ये शिक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा शिक्षण माहिती प्रणालीच्या (डायस) अहवालातून शिक्षणाची ही भयावह स्थिती उघड झाली अाहे. तसेच राज्यातील ४३७ शाळांमध्ये वर्ग खोल्या नसल्याचेही समोर आले आहे.
जिल्हा शिक्षण माहिती प्रणालीकडून (डायस) प्रत्येक वर्षी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी विनाअनुदानित अशा सर्व शाळांचा आढावा घेतला जातो. ‘डायस’च्या अहवालानुसार राज्यात ६४ हजार ३६३ शाळांचा कारभार मुख्याध्यापकाविना सुरू आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात ४ हजार ३८७ शाळांमध्ये नियमित मुख्याध्यापक नाही. अहमदनगर, नाशिक जिल्ह्याची स्थितीही फारशी वेगळी नाही, तर मुंबई जिल्ह्यात १ हजार २२४ शाळांना नियमित मुख्याध्यापक नाहीत.
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्याचे निकष शाळांकडून पूर्ण करण्यात आले किंवा नाही, शाळांमध्ये सुखसुविधा आहे किंवा नाही याबाबतदेखील माहिती या अाढाव्यातून घेतली जाते. शासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचे वास्तव समोर आणणारा डायसचा हा अहवाल शासनाकडूनच जारी करण्यात आला आहे.
शिक्षक नसलेल्या शाळा
शिक्षक नसलेल्या राज्यात १६३ शाळा असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, एकीकडे राज्यात अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील यामध्ये ३२ शाळांचा समावेश आहे. अतिरिक्त शिक्षकांचे या शाळांमध्ये समायोजन करणे शक्य आहे.
शाळा व पटसंख्या
एकूण शाळा १,०६,४९५
एकूण शिक्षक ७,२५,३२५
पहिली-आठवीपर्यंत
पट विद्यार्थी ८५,९६,०१६
विद्यार्थिनी ७५,७६,४१८
एकूण १,६१,७२,४३४
नववी, बारावीपर्यंत पट
विद्यार्थी ३३,५३,५६४
विद्यार्थिनी २८,२६,९७६
एकूण ६१,८०,५३९
बीडच्या सर्वाधिक शाळांत अंधार
राज्यातील तब्बल ६ हजार ४६७ शाळांमध्ये वीजजोडणी नसल्याची माहिती आहे. वीज नसलेल्या सर्वाधिक शाळा बीड जिल्ह्यात असल्याचे अहवालात नमूद आहे. नांदेड, जालना, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळांना वीजजोडणी मिळाली नाही.