अमरावती - विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीची परीक्षा घेतली जाते. मागील काही वर्षांपासून गुणवत्ता यादी बाद करण्यात आली आहे. असे असले तरी या दोन्ही परीक्षांचे महत्त्व कमी झाले नाही. या परीक्षांमध्ये बदल करीत "बेस्ट ऑफ फाइव्ह'च्या आधारे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिले जातात. त्यामुळे गुणवत्ता यादी घोषित करणे बंद झाले असले, तरी विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात.
शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यंदा तब्बल ८६ हजार विद्यार्थी त्यांचे भाग्य आजमावत आहेत. अमरावती जिल्ह्यात बारावीला प्रविष्ट होण्यासाठी ३५ हजार ६२८, तर दहावीच्या परीक्षेसाठी तब्बल ५० हजार ९९३ विद्यार्थ्यांनी तयारी आरंभली आहे. दहावी बारावी मिळून एकूण ८६ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी अमरावती विभागीय शिक्षण बोर्डाकडे त्यांचे अर्ज सादर केले आहेत.
त्यामुळे चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा म्हणून चांगले गुण प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. शिवाय बारावीच्या परीक्षेनंतरदेखील वैद्यकीय, अभियांत्रिकी, डीटीएड यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जाण्याचे मार्ग खुले होतात. फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात बारावीच्या परीक्षा सुरू होतात, त्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांकरिता परीक्षांचा मोसम सुरू होतो. जानेवारी महिना संपत आला असल्याने अनेक शाळांमधील बारावी दहावीच्या विद्यार्थ्यांना या बोर्डाच्या परीक्षेचे वेध लागले आहेत.
आठ हजार "रिपीटर'
बारावीदहावी मिळून जवळपास आठ हजार विद्यार्थी पुन्हा या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये ५,१८१ विद्यार्थी दहावी, तर २,८०२ विद्यार्थी बारावीची परीक्षा पुन्हा देणार आहेत. या परीक्षेमध्ये एकापेक्षा अधिक विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी बोर्डाकडून दिली जाते.
केंद्रांची रचना सुरू
एकते दीड महिन्यांनंतर परीक्षा सुरू होणार असल्याने अमरावती बोर्डाने जिल्ह्यात किती परीक्षा केंद्र राहणार याबाबत माहिती गोळा करण्याचे कार्य बोर्डाकडून सुरू करण्यात आले आहे. केंद्रांची रचना सुरू असल्याने बारावीकरिता किती दहावीकरिता किती केंद्र उपलब्ध होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
35,628 एकूण विद्यार्थी
32,826 नियमित
2,802 पुनर्परीक्षार्थी बारावी
50,993 एकूण विद्यार्थी
45,812 नियमित
5,181 पुनर्परीक्षार्थी दहावी