आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तपोवनात’ आणखी एक अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दहा दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या तपोवन वसतिगृहातील अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू असतानाच याच वसतिगृहात राहणाऱ्या आणखी एका मुलीवर परिसरातील एका ‘काका’ने अत्याचार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
पीडित मुलीने शनिवारी रात्री गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन्ही अत्याचारग्रस्त मुलींना तातडीने शासकीय वसतिगृहात हलवण्यात आले असून, एकापाठोपाठ एक उघडकीस आलेल्या या घटनांमुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दादाराव गोटीराम खंडारे (47,रा. तपोवन) असे अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दहाव्या वर्गात शिकणारी 17 वर्षीय मुलगी निराधार असल्याने मागील वर्षभरापासून ती तपोवन वसतिगृहात राहते. दिवाळीची सुटी असल्यामुळे काही मुली गावी गेल्या होत्या. या वेळी ही मुलगी मात्र वसतिगृहातच थांबली होती. याच दरम्यान एका दिवशी दुपारच्या वेळी ही मुलगी वाचनालयात जात होती. त्यावेळी वसतिगृह परिसरात राहणाऱ्या खंडारेने तिला बोलावले. सोबत चलण्याची गळ घातली. मात्र, तिने नकार दिला. काही वेळानंतर ही मुलगी वाचनालयातून परत वसतिगृहाकडे जात असताना त्याने पुन्हा तिला आवाज दिला. त्यावेळी खंडारे तपोवन आश्रम परिसरात असलेल्या मंदिरालगतच्या एका खोलीत होता. ही युवती खोलीत गेली असता त्याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराला आता जवळपास दोन महिने झाले आहेत. तो व्यक्ती कोण आहे, त्याचे नाव पीिडत मुलीला माहीत नव्हते. मात्र, अत्याचारग्रस्त मुलीने दिलेल्या वर्णनावरून रविवारी सायंकाळी त्याला अटक केली. पोलिसांनी महिला समुपदेशकांच्या मदतीने तपास केल्यानंतर या प्रकरणी पीडित मुलीने शनिवारी रात्री तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपोवनमध्ये काम करणाऱ्या परिसरात राहणाऱ्या त्या ‘काका’ला अटक केली.
आश्रम बंद झाल्यास आम्ही जायचे कुठे ?
पोलिसांनीमागील चार ते पाच दिवसांपासून तपोवनमध्ये कसून चौकशी सुरू केली आहे. यातच तक्रारी दडपल्याचा ठपका ठेवून वसतिगृह अधीक्षक चुटे याला अटक केली. या प्रकारामुळे तपोवनमध्ये राहणाऱ्या वृद्धाश्रमातील काही वृद्धा मुली या पोलिसांकडे येऊन रडत होत्या. या प्रकारांमुळे तपोवन आश्रम बंद होईल आमच्या राहण्याचे वांदे होतील. असे झाल्यास आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न त्या वृद्ध महिला मुलींनी पोलिसांपुढे उपस्थित केला आहे.
शनिवारी रात्री युवतीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये अत्याचार करणाऱ्याचे वर्णन सांगितले होते. त्याआधारे पोलिसांनी रविवारी दादाराव खंडारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी हा उपद्रव त्यानेच केल्याचे पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. दादाराव खंडारे हा कुष्ठरोगावर उपचार घेण्यासाठी २००७ मध्ये तपोवन आश्रमात दाखल झाला होता. उपचार घेऊन तो बरा झाला. त्यामुळे याच ठिकाणी असलेल्या रुग्णालयात तो वॉर्ड बॉय म्हणून काम करायला लागला. संस्थेने परिसरातच त्याला निवास दिले होते. त्याने हा ‘उपद्रव’ केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. उपचारातून बरा झाल्यानंतर त्याने हा उपद्रव केला आहे.
तपोवनच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. या व्यतिरिक्त आणखी काही धक्कादायक प्रकार पोलिस तपासात पुढे येत आहेत. या प्रकरणात शहरात राहणारा एक वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती सहभागी असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. तो व्यक्ती कोण आहे, त्याने नेमके काय काम केले, त्याच्यापर्यंत वसतिगृहातील मुलींना कसे कोणी पोहोचवले याचा शहर पोिलस बारकाईने शोध घेत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक शाळा महाविद्यालय, वसतिगृहांत तक्रार पेटी असायला पाहिजे. तपोवन वसतिगृहातील तक्रार पेटी मुख्याध्यापक, अधीक्षकांच्या कक्षात आहेत. त्यामुळे मुली त्यामध्ये तक्रार करण्यासाठी पुढे जात नसाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळेच पोलिसांनी शुक्रवारी येथे नव्याने पाच ठिकाणी तक्रार पेटी लावल्या. शनिवारी सकाळी त्या उघडल्या असता त्यामध्ये जवळपास २४ मुलींनी तक्रारींच्या चिठ्ठ्या त्यात टाकल्या होत्या. त्यांपैकी एक चिठ्ठी ही शनिवारी रात्री पोलिसांत तक्रार करणाऱ्या युवतीचीही होती. पोलिसांनी ितची चौकशी केली असता, तिने घडलेला घटनाक्रम कथन केला; तसेच या ठिकाणाहून दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केल्यास आपण तक्रारसुद्धा देणार, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी समुपदेशक, तपोवनचे प्रशासक यांची शनिवारी रात्री बैठक घेऊन या मुलीला शासकीय वसतिगृहात पाठवण्याची व्यवस्था केली.