आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेने वाचले टाक्यात पडलेल्या बालिकेचे प्राण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वडाळी परिसरातील देवीनगरमध्ये रविवारी सायंकाळी एक बालिका सार्वजनिक शौचालयाच्या टाक्यात पडली, मात्र एका व्यक्तीच्या सतर्कतेने तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मागील चार ते पाच महिन्यांपासून टाक्याला झाकण नसून, याबाबत नगरसेवकाला माहिती दिल्यानंतरही महापालिकेने अजूनही झाकण न बसवल्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.

आचल राजेश गुप्ता (13, रा. देवीनगर) ही बालिका टाक्यात पडली होती. आचल तिच्या मैत्रिणींसह देवीनगरमधील सार्वजनिक शौचालयाला लागून असलेल्या मैदानावर खेळत असताना जमिनीपासून जेमतेम दोन फूट उंचीवरील सार्वजनिक शौचालयाच्या टाक्यात तोल जाऊन पडली. आरडाओरड करताच चतुर बागडे यांनी सतर्कता दाखवत तिला बाहेर काढले. या टाक्यावर ज्यावर मागील चार ते पाच महिन्यांपासून झाकण नाही.

त्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरसेवक विजय बाभुळकर आणि नगरसेविका सपना ठाकूर यांना झाकण बसवण्याबाबत विनंती केली होती. मैदान लागूनच असल्यामुळे नेहमीच लहान मुले खेळत असतात, त्या टाक्यावर झाकण नसणे, धोक्याचेच आहे, असे असतानाही महापालिकेला ती बाब गरजेची वाटली नाही, असा आरोप परिसरातील संतप्त नागरिकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक भोई आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.