आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वाहने हळू चालवा, अधिकारी झोपेत आहेत!’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘वाहन हळू चालवा, अधिकारी झोपेत आहेत’, ‘सावधान! पुढे मृत्यू उभा आहे’, ‘वेगाला आवरा, मृत्यूला सावरा’ असे लक्षवेधी फलक हातात घेऊन राजापेठ उड्डाणपुलावरील ‘त्या’ डेंजर स्पॉटवर उभे राहत मैत्री विद्यार्थी हेल्पलाइन संघ व विद्यार्थ्यांनी सोमवारी दिवसभर अभिनव आंदोलन करत पुलावरून जाणार्‍या वाहनचालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम केले.
पुलावरून पडून शनिवारी (दि. 21) रात्री दोघा युवकांचा मृत्यू झाला. यानंतर पुलावरील चालकांमध्ये जागृती करण्यासाठी तसेच पुलाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांचे डोळे उघडण्यासाठी मैत्रीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला अमरावतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. इर्विन ते राजापेठ उड्डाणपुलावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वच अपघातांचा हा एकच डेंजर स्पॉट आहे. वर पुलाचे निर्माण करताना पुलावरील तांत्रिक दोषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी तसेच तज्ज्ञांनी केला असून, मैत्री हेल्पलाइन संघाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अभिनव आंदोलन करत सार्‍यांचे लक्ष वेधले. शनिवारी अपघात झाल्यावर सोमवारी सायंकाळी पालिकेतर्फे पुलावरील ‘त्या’ डेंजरस्पॉटवर पांढरा रंग मारण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, तत्पूर्वी ‘मैत्री’चे विद्यार्थी दुपारी बारा वाजतापासून अपघातस्थळी उभे होते. काही वेळानंतर शहरातील विविध महाविद्यालयांतील तरुण त्या ठिकाणी आले, त्यांनीसुद्धा या अभिनव आंदोलनात सहभाग घेतला.
राष्ट्रवादीनेही दिला ‘अल्टिमेटम’ :
उड्डाणपुलावरील ‘त्या’ डेंजरस्पॉटची मनपा अधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 21) पाहणी केली होती. मात्र, अद्यापपावेतो येथे संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या नसल्याने येत्या 30 डिसेंबरपर्यंत पुलावर जाळी न लावल्यास संबंधित अधिकार्‍यांना त्यांच्या दालनात बसू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी दिला आहे. या प्रकरणी अधिकार्‍यांना ‘अल्टिमेटम’ दिल्याची माहिती उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे, शिक्षण उपसभापती मिलिंद बांबल, झोन सभापती प्रवीण मेर्शाम, विजय बाभुळकर यांनी दिली आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे
उड्डाणपुलावरील ‘या’ स्पॉटवर वारंवार अपघात झालेले आहेत. मात्र, महापालिका किंवा एमएसआरडीसीच्या वतीने अद्याप त्या ठिकाणी उपायोजना झाल्या नाहीत. आतापर्यंत झालेल्या दुर्घटनांमधील मृतकांमध्ये युवकांचाच भरणा आहे. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहेत. त्यासाठीच आम्ही ही जनजागृती सुरू केली आहे अविनाश भाकरे, अध्यक्ष, मैत्री विद्यार्थी हेल्पलाइन संघ.