आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये पुलाने घेतला आठवा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ पोलिस स्टेशन ते इर्विन चौकापर्यंतचा उड्डाणपूल अमरावतीकरांसाठी यमसेतू ठरत आहे. शनिवारी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी या पुलावरून दोघे दुचाकीस्वार वीर वामनराव जोशी मार्केटसमोर खाली कोसळले. यात एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. वृत्त लिहिस्तोवर त्याच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उड्डाणपुलावरील श्याम चौकातील टर्निंग पॉइंट दुचाकीस्वारांना घातक ठरत असून, आत्तापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे. यात बहुतांश तरुणांचा समावेश आहे. रात्रीच्या सुमारास उड्डाणपुलावरील पथदिवे बंद असतात. याशिवाय उड्डाणपुलावर तीन ठिकाणी बांधण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढर्‍या रंगांचे रेडियमचे पट्टे नाहीत. शनिवारी दुचाकीस्वार पडून झालेल्या अपघातालाही हेच कारण असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
अकोला येथील अकोट फैलच्या सोळाशे प्लॉटमधील दोघे युवक प्रथमच या उड्डाणपुलावरून जात होते. वळणावर गतिरोधक असल्याचे त्यांना माहीत नव्हते. यामुळे त्यांना वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही, अशी माहिती या युवकांच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे. युवक कोसळल्यानंतर घटनास्थळी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि नागरिकांनी धावपळ करत दोघाही तरुणांना इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र, एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. बचावासाठी धावाधाव करणार्‍या नागरिकांनी रस्त्यावरील वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारचाकी वाहनचालकांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही.
अधिकार्‍यांवर त्वरित दाखल करावा गुन्हा
राजकमल उड्डाणपुलावरील हे धोकादायक वळण जीवघेणे असल्याचे पत्र पोलिसांनी वारंवार महापालिका व एमएसआरडीसीला पाठवले. मात्र, यानंतरही याकडे दुर्लक्ष झाल्याने महापालिका आणि एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांनी दरवेळी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या प्रसंगी प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी केली तसेच अधिकार्‍यांविरोधात संताप व्यक्त केला.
हस्तांतरणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित
एमएसआरडीसीने उड्डाणपुलाचे अद्यापही महापालिकेला हस्तांतरण केलेले नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या डागडुजीचा खर्च कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रेडियम रिफ्लेक्टर डिव्हायडर केव्हाच गायब झाले असून, धोकादायक वळण असलेल्या ठिकाणी सिग्नल ब्लिंकर्सही नाहीत किंवा माहिती फलक आणि रेडियम ही महत्त्वाची कामेही हस्तांतरणामुळे अद्यापही प्रलंबित आहेत.
संरक्षक जाळीचे 10 लाख गेले कुठे?
तब्बल आठ जणांचे बळी घेणारा राजापेठ ते इर्विन उड्डाणपुलादरम्यान श्याम चौकातील वळण वाहतुकीच्या दृष्टीने डेंजर झोन ठरले आहे. त्यामुळे वळणावरून कोसळणार्‍यांचे प्रमाण रोखता यावे, यासाठी उड्डाणपुलावर उंच जाळी व संरक्षक कठडे बसवण्यात येणार होते. यासाठी आमदार शोभा फडणवीस यांनी दहा लाख रुपयांचा निधी विशेष फंडातून जाहीर केला होता. मात्र जुलै 2013 मध्ये जाहीर झालेला हा निधी नेमका कुठे गेला, या बाबत संभ्रम आहे.
तज्ज्ञ म्हणतात, सेंट्रिफ्युगल फोर्सचा दोष
राजकमल उड्डाणपुलाचे हे वळण समांतर आहे. त्यामुळे वेगाने वळण घेणारा वाहनचालक पुलाच्या कठड्यावर कसा आणि केव्हा जाऊन आदळतो, हे चालकालाही कळत नाही. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वाहनाला खेचत असते. पुलावरील या वळणाच्या ठिकाणी एका बाजूने उंचवटा गरजेचा होता. त्यामुळे राजापेठकडून इर्विनकडे जाणार्‍या चालकांचा मध्यवर्ती वेग व नियंत्रण ज्याला ‘सेंट्रिफ्युगल फोर्स’ असे म्हटले जाते किंवा साध्या भाषेत संतुलन असे याला म्हणता येईल, ते साधले गेले असते. ते सध्या होत नाही, असे मत तंत्रशिक्षण उपसंचालक तथा स्थापत्य अभियंता सागर पासेबंद यांनी व्यक्त केले.
पुलावर आहेत 90 ‘डेंजर स्पॉट’
राजकमल ते इर्विन चौक तसेच पंचवटी ते गाडगेनगर या दोन्ही उड्डाणपूलावर एकूण 90 डेंजर स्पॉट आहेत. त्यातील 60 राजकमल ते इर्विन आणि 30 पंचवटी ते कॅम्प उड्डाणपुलावर आहेत. पंचवटी चौकातील पुलावर एक खांब सोडून डेंजर स्पॉट आहेत. खांबाच्या वायर बॉक्सचे झाकण चोरीला गेल्याने वायर उघडे पडलेत. दोन्ही उड्डाणपुलावर असलेल्या 110 पैकी 90 वीज खांबांवरील वायर खुल्या आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
पोलिसांना वाहनांची कमतरता
अपघातस्थळी तातडीने बचाव करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी धावाधाव केली. मात्र, चारचाकी वाहन नसल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कोतवाली पोलिसांचे एक वाहन हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला गेले आहे, तर दुसरे वाहन अपघात घडला तेव्हा गस्तीवर होते. यामुळे जखमींना खाजगी वाहनातूनच इर्विनमध्ये उपचारासाठी न्यावे लागले. तातडीने पर्यायी व्यवस्था असती, तर युवकाचा प्राण वाचला असता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.