आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये लोडशेडिंग विरोधात रास्ता रोको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- इतवारा बाजार परिसरातील पाच फीडरवरील भारनियमनविरोधात पुकारण्यात आलेला लढा अद्यापही सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनात आठव्या दिवशी गुरुवारी तब्बल 19 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपोषणस्थळी पोहोचण्यासाठी नागरिक निघाले होते. सकाळी त्यांनी चित्रा चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याने येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ऐनवेळी आंदोलन सुरू झाल्याने इतवारा बाजाराकडून इर्विन चौक व इतर मार्गांनी जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांना पांगवले. त्यामुळे या ठिकाणी काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.


मुश्ताक खान रहीम खान, जनाब हाजी मसूद, हाजी आबिद साहब, शहजाद अनिस खान, आरिफ खान, डॉ. फहीम किदवई, मोहम्मद मसरूर आदींनी गुरुवारी सकाळपासून उपोषण प्रारंभ केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा लढा सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत शहरातील अनेक अधिकारी-पदाधिकार्‍यांनी उपोषण मंडपाला भेट देऊ न आपला पाठिंबा दर्शवला. शहरातील 54 पैकी केवळ पाच फीडरवरच भारनियमन सुरू असल्याने इतवारा बाजार, ताजनगर, ट्रान्सपोर्टनगर आदी भागांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे..

आंदोलकांवर गुन्हे दाखल
चित्रा चौकात संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शंभरावर आंदोलकांविरुद्ध गुरुवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजित पाटील, पोलिस आयुक्त

पोलिस आयुक्तांची भेट घेणार
चित्रा चौकातून नागरिक आंदोलनस्थळी येत होते. त्यांची संख्या जास्त असल्याने रस्ता अवरुद्ध झाला होता. या वेळी मी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. याकामी पोलिसांचेही सहकार्य लाभले. गुन्हे दाखल झाल्यास आयुक्तांना भेटून गुन्हे मागे घ्यायला सांगू. हाजी अब्दुल रहीम, अध्यक्ष, हेल्पलाइन, अमरावती.

पोलिस-आंदोलकात वादावादी
चित्रा चौकात आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानंतर या ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यंमध्ये वादावादी झाली. यानंतर पोलिसांनी सुमारे शंभरावर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याने या मार्गावरून जाणार्‍या अनेकांची मोठी तारांबळ उडाली होती. आंदोलकांनी गाड्या अडवत निषेध नोंदवला.

मुद्दा राज्य शासनाच्या कक्षेत
शहरातील पाच फीडरवरील भारनियमन रद्द करण्याची बाब स्थानिक अधिकार्‍यांच्या अधिकारकक्षेत नसल्याने हा मुद्दा राज्य शासनाकडे वळता करण्यात आला आहे. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अँड. यशोमती ठाकूर व आमदार अभिजित अडसूळ यांनी दोन दिवस जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात ठरल्यानुसार भारनियमन रद्द करण्याचा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.