आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activist Strike Issue At Amravati, Divya Marathi

कार्यकर्त्यांचा बसमध्ये तीन तास ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेतून काढून नवीन गाड्या देण्यात याव्यात, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेने बुधवारी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर नादुरुस्त झालेल्या बसवर आमदार कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताबा मिळवला आणि तीन तास बसमध्येच ठिय्या दिला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांशीही बसमध्येच चर्चा केली.

बुधवारी दुपारी 12:30 च्या सुमारास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शेगाव- ब्रम्हपुरी बसवर (एमएच 40 वाय 5231) ताबा मिळवला. त्यापूर्वी बसमधील 64 प्रवाशांना पर्यायी बसने रवाना करण्यात आले. कार्यकर्त्यांनी बसचा ताबा घेत स्वत:ला बसमध्ये डांबून घेतले. बसचे दरवाजे साखळीने कुलूपबंद करण्यात आले. मागण्या पूर्ण होईस्तोवर बसच्या खाली उतरणार नसल्याची भूमिका आमदार कडू यांनी घेतली होती. आंदोलनाची माहिती मिळताच वलगावचे ठाणेदार शिरीष राठोड, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलिस आयुक्त लतीफ तडवी यांनी मोठय़ा संख्येने पोलिस कुमक पुलावर तैनात केली होती. काही वेळानंतर एसटी महामंडळाचे अमरावती येथील प्रादेशिक अभियंता राठोड, विभागीय वाहतूक नियंत्रक के. एम. महाजन, जिल्हा वाहतूक अधिकारी आर. एन. पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक उमेश इंगळे यांच्यासह अन्य अधिकारी आंदोलनस्थळी हजर झाले. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यात आली.
आंदोलनामध्ये छोटू महाराज वसू, धीरज जयस्वाल, शंभू मालठाणे, जोगेंद्र मोहोड, राजेश वाटाणे, भारत उगले, राजेश वानखडे, चंदू खेडकर, अज्जू पठाण, समाधान वानखडे यांच्यासह शेकडो प्रहार कार्यकर्ते सहभागी झाले होते.