अमरावती - तब्बल सहा महिन्यांनंतर कापसाच्या भावात जीव आला. सध्या त्याला 5,300 रुपये दर मिळत आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये हंगाम शिगेला असताना हा दर मिळाला होता. त्यानंतर भावात सतत घसरण होऊन तो पाच हजार रुपयांवर स्थिर झाला होता.
जिल्ह्यात जानेवारीनंतर भावात घसरण सुरू झाल्यानंतर शेतक-यांनी कापूस विक्रीस काढला नाही. पाच हजार रुपये भाव शेतक-यांना परवडणारा नसल्यामुळे भाववाढीबाबतही शेतक-यांमध्ये चिंता पसरली होती. दरम्यान, मागील आठवड्यापासून कॉटन मिलकडून कापसाची मागणी वाढल्याने भाव वधारल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. शहरात सध्या खासगी व्यापा-यांकडून कापसाची खरेदी सुरू आहे. दरम्यान, कापसाला जिनिंगवर 5300 रुपये दर मिळत असला, तरी शेतक-यांच्या दारात कापूस 5200 रुपये दराने खरेदी केला जात आहे. शेतक-यांना मिळणा-याया भावातही कापूस विकणे परवडणारे नसल्यामुळे शेतक-यांना यापेक्षा अधिक भावाची अपेक्षा आहे. दरम्यान, ज्या शेतक-यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत, अशाच शेतक-यांकडून कपाशीची विक्री होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
भाजीपालाही कडाडला
पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली. काही भाज्यांसाठी मात्र किरकोळ बाजार तेजीत राहिला. यात कोथिंबीर, कारले, फूलकोबी आदी भाज्यांचा समावेश आहे. दरम्यान, ठोक बाजारात कोथिंबीर चार हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले.