आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलालांचे ‘मॉडेल’ रेल्वे स्थानक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांची लूट चालवल्यामुळे नागरिकांनी एसटी व रेल्वे या हक्काच्या वाहतूक साधनांना पसंती दर्शवली आहे. मात्र, रेल्वे स्थानकावरील बेबंदशाहीमुळे येथेही प्रवाशांचा हिरमोडच होत आहे. दरम्यान, भाऊबीजसह अन्य सुट्यांमुळे भ्रमंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी उसळली होती. रेल्वे आरक्षण खिडकीवर दलालांचा बोलबाला वाढल्याने प्रवाशांना येथेही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्टेशनवर दलालांचा सुळसुळाट झाला असून, दिवाळीनंतर परतीच्या प्रवासाचे आरक्षण करायला येणार्‍यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. दिवाळी आटोपल्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी आहे; परंतु त्यांना काळ्याबाजारातून तिकीट विकत घ्यावे, याचे नियोजन करणारी एक चमूही त्याचवेळी सक्रिय झाली आहे. नकली प्रवाशी म्हणून भाडोत्री उमेदवारांना रांगेत उभे करणे आणि नंबर लागताच मिळेल त्या मार्गाच्या व उपलब्ध असेल त्या र्शेणीचे तिकीट विकत घेणे, अशी या दलालांची ‘मोडस् ऑपरेंडी’ आहे. ‘बिदागी’ मिळत असल्याने तिकीट देणारे रेल्वेचे कर्मचारीही त्यांच्याच सुरात सूर मिसळत आहेत.

रांगेत बनावट प्रवासी
रेल्वेचे तिकीट काढताना प्रत्येकाला हातात स्वत:ची ओळख पटवणारी कागदपत्रे आणि ज्या ठिकाणी जायचे आहे, त्यासाठीचा फॉर्म बाळगावा लागतो. दलालांनी उभे केलेल्या माणसांकडे यांपैकी काहीही असत नाही; परंतु एकदाचा नंबर लागला. की ताबडतोब दलाल उपस्थित होतो आणि जी तिकिटे उपलब्ध आहेत, ती तो खरेदी करतो. त्याची दादागिरी एवढय़ावरच थांबत नाही. गुप्तपणे इकडे-तिकडे फिरकणार्‍या आपल्या सवंगड्यांना तो फोन करून बोलवतो आणि त्याने (सवंगड्याने) आधीच नंबर लावला होता, असे निर्ढावलेपणे सांगून त्यालाही तिकिटे मिळवून दिली जातात. त्यामुळे तासन्तास रांगेत उभ्या असणार्‍या प्रवाशांना तिकिटेच मिळत नाहीत.

सोयींचीही बोंबच
रेल्वे स्थानकावर सोयींचीही बोंब आहे. स्वच्छतागृह घाणेरडी आहेत. मंगळवारी ‘दिव्य मराठी’ चमूने व्यवस्थांचा आढावा घेतला असता स्वच्छतागृह बंद असल्याचे आढळून आले. सकाळी स्थानकावर प्रवाशांना पिण्याचे पाणीही उलब्ध नव्हते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एकीकडे आवश्यक तिकिटे तर मिळालीच नाहीत आणि दुसरीकडे नैसर्गिक विधी आणि आवश्यक गरजांची पूर्तताही प्रवाशांना करता आली नाही. काही जागरूक नागरिकांनी हा मुद्दा स्टेशन मास्तरांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; परंतु मंगळवारी ते स्थानकावर उपलब्ध नव्हते.

ड्युटी लावण्यासाठीही चिरमिरी
रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर कोणत्या वेळेत कोणाची ड्यूटी असावी, यासाठीही गोलमाल होत असल्याची तक्रार प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केली. चक्क चिरीमिरी देऊन या ड्यूटीज् बळकावल्या जातात. सकाळच्या सत्रात तोच तिकीट क्लार्क आणि तोच तो शिपाई कामावर असतो. त्यामुळेच नेमक्या वेळी संबंधित कर्मचार्‍यांचीच नियुक्ती कशी केली जाते, असा प्रश्न आता थेट रेल्वेचेच कर्मचारी विचारत आहेत.


पोलिस नावापुरताच
तिकिटे काढताना वारंवार होणार्‍या तक्रारी लक्षात घेता, या ठिकाणी पोलिस शिपाई तैनात करण्यात आला आहे. म्हणायला हा शिपाई आरपीएफचा आहे; परंतु हातात असलेली काठी हलवण्याशिवाय तो काहीही करीत नसल्याची तक्रार प्रवाशांची आहे. दलालांशी त्याचे साटेलोटे असल्याचाही प्रवाशांचा आरोप आहे. यावर आळा घालण्याची मागणी होत आहे.

दलालांना सारे काही माफ
नियमानुसार जो फॉर्म भरून आणला आहे आणि त्यावर ज्या शहराचे (जाण्या-येण्याचे) नाव लिहिले आहे, त्यासाठीचीच तिकिटे दिली जातात. फार तर एकाच मार्गावर धावणार्‍या चार ट्रेन असतील आणि जाणार्‍याला त्यापैकी विशिष्ट ट्रेनच हवी असेल, तर उपलब्धतेनुसार ती बदलून घेण्याची मुभा दिली जाते. मात्र, दलालांना यांपैकी कुठलाही नियम लागू नाही. त्याला फॉर्ममध्ये नाव, गाव, वय, पत्ता; एवढेच नव्हे, तर ट्रेनचे नंबर्स बदलण्याचीही सोय करून दिली जाते. निर्धारित कोट्यापेक्षा अधिक तिकिटेही दिली जातात.

असे आहे दलालांचे जाळे
अमरावती रेल्वे स्थानकावर दलालांचे मोठे जाळे आहे. रेल्वे स्थानकाच्या दारासमोर असलेला एक पानठेला त्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय सक्करसाथ (सराफा बाजार), राजापेठ या भागांतही दलालांचा मोठा वावर आहे. विशेष असे, की संख्येने वीसच्या आसपास असलेले हे सर्व दलाल एक-दुसर्‍याला मदत करतात. रेल्वे स्थानकावरच्या चारही काउंटरवर यांची ‘चलती’ असते. काहींनी तर चक्क आपल्या घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसेस उघडून ठेवले आहेत. निर्धारित किमतीपेक्षा दीडशे-दोनशे रुपये जास्त घेऊन ते पाहिजे ती तिकिटे तुम्हाला देऊ शकतात.

मला बोलण्याचा अधिकार नाही
रेल्वेचे तिकिट काढताना दलाल घुसखोरी करतो, अशा तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात. वेळोवेळी प्राप्त झालेल्या तक्रारी भुसावळ रेल्वे मंडळाकडे पाठवल्या जातात. मध्यंतरी कारवाईही झाली होती; परंतु याबाबत मी अधिकृत बोलू शकत नाही. सध्या माझी ड्यूटी आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी या नात्याने विजयसिंह किल्लेदारच काय ते सांगू शकतील. मला याबाबत अधिक काही बोलता येणार नाही. महेंद्र लोहकरे, उपस्टेशन मास्तर, अमरावती.