आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Minister Radhakrishna Vikhe Patil ,Latest News In Divya Marathi

गारपीटग्रस्तांसाठी नव्हे, राजकीय सभांसाठी वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अकाली पाऊस आणि गारपिटीने अमरावतीकरांचे डोळे पाणावले असतानाही दिसेनासे झालेले पालकमंत्री तथा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शुक्रवारी अखेर जिल्ह्यात दाखल होण्याचा मुहूर्त सापडला. पण, हा मुहूर्त शेतकर्‍यांसाठी नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेसाठी होता.
हजारो हेक्टरवरील सुमारे 1200 कोटी रुपयांच्या पिकांची गारपिटीने पूर्णपणे नासाडी केली आहे. एक पैशाचे पीकही शेतकर्‍यांच्या हाती लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. अशात अमरावती जिल्ह्याचे पालकत्व आणि कृषिमंत्रिपद अशी दुहेरी जबाबदारी असलेले राधाकृष्ण विखे पाटील तातडीने अमरावती जिल्ह्यात येतील, शेतकर्‍यांच्या, शेतमजुरांच्या डोळ्यातील अर्शू पुसतील, शासकीय मदत जाहीर होईल तेव्हा होईल पण किमानसांत्वना तरी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अतिवृष्टीत ज्या प्रमाणे पालकमंत्र्यांनी अमरावतीकडे पाठ फिरवली, अगदी तीच संवेदनाहीन वर्तन राधाकृष्ण विखे यांचे गारपिटीतही दृष्टीस पडले.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना हजेरी लावणं, अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी मुक्काम असा पालकमंत्र्यांना दिनक्रम सुरू होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने आठ मार्चला परखड वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पालकमंत्र्यांनी फोनवरूनच नुकसानाचा आढावा घेतला; जिल्ह्यात येण्यासाठी मुहूर्त त्यांना सापडत नव्हता. अखेर तो सापडला राजकारणासाठीच. जिल्ह्यात येताच पालकमंत्री थेट राजकीय व्यासपीठावरच अवतरले. चार महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक आहे.
आपल्याला पुन्हा अमरावतीचे पालकमंत्री होणे नाही. त्यामुळे आता राहिलेय तरी काय, असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर सभेदरम्यान होते. मात्र, आपल्या या कृतीचे परिणाम चार महिन्यानंतर स्वपक्षीय आमदार किंवा उमेदवारांना भोगावे लागतील काय, याचे कोणतेही सोयरसुतक त्यांना नव्हतं. सभा, प्रचार आणि त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत निघालेल्या राणा यांच्या फेरीत पालकमंत्र्यांसह सारे नेते हसतमुख चेहर्‍याने वावरत होते. दुसरीकडे आजही शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबलेले नाहीत.