आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture News In Marathi, Circle Officers, Divya Marathi, Field Work

कृषी कार्यालय वार्‍यावर; शेतकर्‍यांची पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंजनगावसुर्जी - दोन मंडल अधिकार्‍यांच्या नेतृत्वात तालुका कृषी कार्यालयाचा कारभार सांभाळणारे कर्मचारी सदोदित ‘फिल्ड वर्क’चे कारण पुढे करून कार्यालयाबाहेर राहत असल्यामुळे तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या चकरा अद्याप थांबलेल्या नाहीत. सोमवारीदेखील त्याला साजेसेच चित्र होते. साडेअकरा वाजले तरी एकही कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला.


अंजगावसुर्जी येथील नवीन बसस्थानकानजीक तालुका कृषी कार्यालय आहे. तालुक्यातील शेतकरी बाजारहाट व कार्यालयीन कामे करून घेण्यासाठी शहरात येतात. नेहमीप्रमाणे सोमवारीदेखील काही शेतकरी गारपीटग्रस्तांना मिळणार्‍या मदतीची चौकशी करण्यासाठी कृषी कार्यालयात आले होते. तथापि, साडेअकरा वाजले तरी दोन्ही मंडल अधिकारी, कृषी सहायक व मुख्य कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात आले नव्हते.


कसबेगव्हाण येथील दादाराव इसळ, खोडगावचे नागोराव हरणे व दर्यापूर येथील विनायक ढोके यांनी सुमारे एक तास कार्यालयात ठिय्या मांडून कर्मचार्‍यांची वाट पाहिली. परंतु, कर्मचारी कार्यालयात न पोहोचल्याने त्यांनी थेट सदर प्रतिनिधीपुढे समस्या मांडली. त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पाहिले असता, अंजनगाव शहर मंडळ व कापूसतळणी कार्यालयातदेखील तीनच कर्मचारी कार्यरत होते. यावरून शेतकर्‍यांच्या कामाप्रति हे अधिकारी व कर्मचारी किती बेजबाबदारपणा दाखवतात, हे दिसून आले.


चौकशीअंती होईल कारवाई
रविवारी (दि. 23) येथील नगरपालिकेची पोटनिवडणूक होती. त्यामध्ये कर्मचार्‍यांची ड्युटी असल्याने सोमवारी कर्मचारी अद्याप कार्यालयात आले नाहीत. त्यांचा कोणताही सुटीचा अर्ज आला नाही वा तोंडी संवाद झाला नाही. चौकशी करून कोणती कारवाई करायची, ते ठरवू. एस. डी. इंगोले, तालुका कृषी अधिकारी, अंजनगावसुर्जी.