आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाचा दारू पिऊन गोंधळ; गुन्हा दाखल, शालेय परीक्षेदरम्यान घडला प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - अचलपूर येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षकाने शालेय परीक्षेदरम्यान गोंधळ घातला. ही घटना बुधवारी घडली. हा शिक्षक चक्क दारू प्यायलेला होता. मुख्याध्यापकांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे शहरातील ही यावर्षीची दुसरी घटना होय.
दहावी अाणि बारावीची परीक्षा संपल्यानंतर जानकीबाई विद्यालयात शाळा स्तरावरील परीक्षा सुरू झाल्या. बुधवारी शाळेच्या परिसरात शिक्षक नीलेश करडे हा परीक्षेदरम्यान दारू प्यायलेल्या अवस्थेत गोंधळ घालताना आढळून आला. या प्रकाराने विद्यार्थिनी चकरावून गेल्या. विशेष म्हणजे ही शाळा कन्या विद्यालय असल्याने एका पुरुष शिक्षकाचा प्रताप थेट मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचला. मुख्याध्यापकांनीही या प्रकाराची तत्काळ दखल घेत या शिक्षकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिक्षकाच्या या कृत्यावर पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मुख्याध्यापिका ज्योती जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या बाहेरगावी असल्याने सध्या काहीही वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दोषी शिक्षकाशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी शैक्षणिक संस्थेचे संचालक मंडळ पंचायत स्तरावरील अधिकार काय कार्यवाही करतात, या बाबीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया नको
ही घटना शाळा स्तरावरची आहे. सध्या या प्रकणात कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. माधुरीदेशमुख, अध्यक्ष, हायस्कूल एज्युकेशन संस्था, अचलपूर.

घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. उज्ज्वलाकाळपातळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अचलपूर.

वर्षातील दुसरी, तर शाळेची पहिलीच घटना
यापूर्वी अचलपूर नगरपरिषदेत अंतर्गत येणाऱ्या विदर्भ मिल येथील प्राथमिक शाळेत असाच प्रकार घडला होता. या शिक्षकावर पालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. नुकतीच विद्यार्थिनीची छेड काढण्याची घटना राष्ट्रीय शाळेत घडली. काही शिक्षकांच्या या कर्तृत्वामुळे (?) शिक्षण क्षेत्राला मान खाली घालावी लागत आहे.