अमरावती - प्रदेश पातळीवर जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेचे पडसाद शहरातही युतीचा भागीदार असलेल्या शिवसेनेत उमटले आहेत. शिवसेनेने जिल्ह्यातील आठही जागा लढवण्याची तयारी चालवली आहे. युती तोडण्याची भाषा करणा-या भाजपला स्वबळावर लढून ताकद दाखवून देण्याची मानसिकता शिवसैनिकांनी तयार केली आहे.
शिवसेना व भाजपमध्ये अनेक वर्षांपासून युती आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी रिपाइं (आठवले) जुळल्याने त्याचे रूपांतर महायुतीत झाले. ‘मोदी लाटे’वर स्वार होऊन मिळालेल्या लोकसभेतील यशानंतर भाजप नेते महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करू लागले आहेत. प्रत्युत्तरादाखल स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून निर्गमित झाले असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्वच पदाधिका-यांना, याबाबत सूचना प्राप्त झाल्याने कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे.
अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा सद्य:स्थितीत दर्यापूर येथे एकमेव आमदार आहे. बडनेरा, तिवसा, अचलपूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले. धामणगावरेल्वे, मोर्शी-वरुडमध्येही भाजप उमेदवाराला चांगली मते पडली. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बडनेरा, अचलपूर, दर्यापूर व तिवसा, तर भाजपने अमरावती, वरुड-मोर्शी, धामणगावरेल्वे व मेळघाट मतदारसंघ लढवला होता. अशा स्थितीत स्वबळावर निवडणूक लढवल्यास जिंकून येऊ शकतात अशांवर पक्षाचे लक्ष आहे.
आदेशाचे पालन करू
- मुंबई येथील बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेतला. स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. कदाचित तशी वेळ आल्यास ‘मातोश्री’वरून आदेश धडकतील. त्यांचे पालन आम्ही करू. अभिजित अडसूळ, आमदार, दर्यापूर.