आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत उड्डाणपुलावर लागले लोखंडी कठडे; राष्ट्रीय महामार्गाची ‘डमी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- इर्विन ते राजापेठ उड्डाणपुलावरील श्याम चौकातील वळणावर आतापर्यंत दहा अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 21) झालेल्या अपघातात दोन युवक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेने बुधवारी अखेर पुलावरील धोकदायक वळणावर पाच फूट उंचीचे लोखंडी कठडे बसवले.
उड्डाणपुलावर झालेले अपघात श्याम चौकातील वळणावरच झालेले आहेत. त्यामुळे या धोकादायक वळणावर लोखंडी जाळी लावण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच झाला होता. महापालिकेने त्यावर अद्याप जाळी लावली नव्हती. मात्र, शनिवारी रात्री झालेल्या अपघातातानंतर मागणीने पुन्हा उचल खाल्ली. अमरावतीकरांसह मैत्री विद्यार्थी संघटनेने महापालिका आणि एमएसआरडीसी प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला होता. मंगळवारी (दि. 24) महापालिकेत याच जाळीवरून चांगलेच वादंग झाले. शहर अभियंत्यांना महापालिका आयुक्तांनी 28 डिसेंबरची ‘डेडलाइन’ दिली. यानंतर पालिकेच्या अधिकार्‍यांनीही गांभीर्य दाखवत लोखंडी कठडे उभे करण्याचे काम हाती घेतले.
बुधवारी सकाळपासूनच पुलाच्या टोकाला असलेल्या पूर्वीच्या लोखंडी कठड्याच्या वर पाच फूट उंचीचे लोखंडी कठडे नव्याने उभे करण्याचे काम सुरू केले. सायंकाळपर्यंत कठडे उभे करण्याचे पूर्ण झाले. उड्डाणपुलावर असलेल्या गतिरोधकांच्या आजूबाजूने पांढरे पट्टे मारले. लोखंडी कठडे आणि धोकादायक वळणाच्या ठिकाणी रेडियमचे दिशादर्शकसुद्धा लावण्यात येणार आहेत.
दिवस-रात्र सुरू आहे काम
उड्डाणपुलावरील लोखंडी कठडे बसवण्यावरून शहरातील नागरिकांनी महापालिकेविरुद्ध चांगलाच रोष व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी व प्रत्यक्षात काम करणार्‍या यंत्रणेने सध्या उड्डाणपुलावर दिवसरात्र काम सुरू ठेवले आहे. सकाळी सुरू झालेले काम उशिरा रात्रीपर्यंतही सुरू आहे. कारण 28 डिसेंबरपूर्वी ते पूर्ण करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी केले स्वागत
नऊ बळी गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने प्रत्यक्षात कार्यवाही करत पुलाचे रूपच बदलवले. पुलावर केलेल्या प्रत्यक्ष कामांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. यापूर्वीच ही कामे होणे गरजेचे होते, असे मत अमरावतीकरांनी व्यक्त केले आहे. पुलावर केलेल्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘सोलर ब्लिंकर’ही लवकरच चमचमणार
धोकादायक वळणावर लोखंडी कठड्यासोबत सोलर ब्लिंकरचाही वापर करण्यात येणार आहे. प्रत्येकी नऊ हजार किमतीचे सहा ब्लिंकर या वळणावर लागणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे ब्लिंकर आणि रेडियम पुलावर दिसतील. 28 डिसेंबरपर्यंत काम पूर्णत्वास जाईल. या संपूर्ण प्रकल्पावर आठ ते दहा लाख रुपये खर्च होणार आहे. यासाठी विशेष तरतूद केली आहे.
-अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त.