आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Garampanchayat Election Result Come Out

लोकसभा, विधानसभेनंतर अाता ग्रामपंचायतीतही परिवर्तनाची नांदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लोकसभा विधानसभा निवडणूकीत प्रस्थापितांना झिडकारल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही बहुतांश ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थािपतांना लोळवून जोरदार ‘दे धक्का’ दिला. गावकुसातील दिग्गजांच्या राजकारणाला खीळ बसली असून परिवर्तनाचे वारे गावखेड्यातही जोरदार वाहिले असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

मागील वर्षी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना भुईसपाट केले. बदलाची ही लाट ग्रामपंचायतीत निवडणुकीतही दिसून आली. अनेक वर्षांपासून सत्ताकेंद्रावर असलेल्या प्रस्थापितांना यावेळी तरूणाईने जोरदार धक्का दिला. सर्वच तालुक्यात मतदारांनी अपक्ष उमेदवारांनाही मोठ्या प्रमाणात पसंती दिली.
विविध राजकीय पक्षांच्या समर्थनाखाली असलेल्या बड्या नेत्यांच्या पॅनेला अनेक ठिकाणी मतदारांनी झिडकारून नवोदितांना संधी दिली. वर्षानुवर्षे सत्ताकेंद्र काबीज करूनही गावांचा विकास होऊ शकला नाही. अनेक वर्षांपासून मुलभूत समस्या जैसे थे असल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसून आले. सिमेंटचे उखडणारे रस्ते, वाहून जाणारे रपटे, समाजभवन या पलिकडे उत्पन्नाचा स्त्रोत वाढावा यासाठी कोणत्याच प्रस्थापितांकडून प्रयत्न झाल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट दिसून आली.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सातेगाव ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून आमदार रमेश बुंदिले यांचे समर्थक बाजार समितीचे माजी सभापती नंदकिशोर काळे यांचे वर्चस्व होते. यावेळी मतदारांनी ते मोडीत काढून संजय हाडोळे, महेश खारोळे, कपिल देशमुख यांच्या गटाच्या झोळीत भरभरून माप टाकले. तेरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत हाडोळे गटाच्या १२ जागांवर विजय मिळाला.

एक जागा अन्य गटाने मिळवून काळे यांच्या गावकरी पॅनेलला एकही जागा िमळवता आली नाही. तालुक्यातील धनेगाव येथे मागील ४० वर्षांपासून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांची एकहाती सत्ता होती. यावेळी मात्र हाडोळे यांची सत्ता समाधी भंग झाली. बंडु पाटील येवले हेमंत येवले यांच्या बहुजन ग्रामविकास आघाडीने पैकी सहा जागा जिंकल्या. आमदार रमेश बुंदिले यांच्या भंडारज ग्रामपंचायतीत त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.


नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या धानोरा गुरव - शिलोड या गट ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणूकीचा गुरूवारी निकाल लागला. निकाल लागल्यानंतर विरोधी उमेदवार त्यांच्या समर्थकांनी फेरी गावातून काढली. यावेळी फेरीतील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी एका पराभूत महिला उमेदवाराच्या घरासमोर नारेबाजी शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून दाेन गट समोरासमाेर आले. ही माहीती अवघ्या काही क्षणातच लागूनच असलेलया धानोरा गुरव गावात पोहचली. यावेळी त्या गावातीलही दोन्ही गट समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना मारहान सुरू केली.
काही वेळातच दोन्ही गट एकमेकांवर लाठ्या काठ्या घेऊन तुटून पडले. या संघर्षात तीन जण जखमी झाले. घटनेची माहीती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलिसांसह अमरावती ग्रामीणची राखीव पोलिस कुमव तसेच एसआरपीएफ धानोरा गुरवमध्ये दाखल झाली होती. पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांना ताब्यात घेतले होते.
नवोदीतांना संधी

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत परंपरागत असलेल्या वर्चस्वाला यावेळी नवोदितांनी तडा दिला. अपक्षांचीही सरशी यावेळी दिसून आली. वर्षानुवर्षे सत्ता केंद्र ठेवणाऱ्या स्थािनक राजकारण्यांना या परिवर्तनाच्या नांदीमुळे जबर धक्का बसला. जिल्ह्यात बहुतांश उमेदवार तरूण होते. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत तरुण सरपंच दिसून येणार आहेत.