आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Municipal Corporation Meet Member Absents Issue

मनपाची आमसभा नेमकी कोणासाठी; वर्षभरात 17 टक्के सदस्य मारतात दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वर्षभरात झालेल्या 14 पैकी एकाही आमसभेत एकूण 92 सदस्यांची शंभर टक्के उपस्थिती नव्हती. आमसभेतील उपस्थित सदस्यांची टक्केवारी 67.50 टक्के, तर अनुपस्थित सदस्यांची टक्केवारी 17.14 एवढी आहे. शहरातील समस्यांमध्ये वाढ होत असतानाच सदस्य गैरहजर राहत असल्याने महत्त्वपूर्ण प्रश्नांना ‘ब्रेक’ लागतो. परिणामी, महापालिकेची आमसभा कोणासाठी, असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे.
शहराविषयी धोरण ठरवणे, शासनाच्या पत्रावर चर्चा, प्रशासनाची चूक लक्षात आणून देण्यासाठी आमसभा महत्त्वपूर्ण ठरते. सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करता यावी म्हणून प्रत्येक महिन्यात महापालिकेतील सर्व सदस्यांसाठी आमसभेचे आयोजन केले जाते. जनतेच्या समस्यांची सोडवणूक करता यावी म्हणून आमसभा होत असून, त्यामध्ये सर्व सदस्यांची उपस्थिती गरजेची आहे. असे असतानाही 2013 या वर्षात झालेल्या विशेष आणि महिन्यातील एक याप्रमाणे एकूण 15 आमसभांना सदस्यांची शंभर टक्के उपस्थिती नव्हती.
प्रत्येक आमसभेत अनुपस्थित राहणार्‍या सदस्यांची संख्या दुहेरीच राहिली आहे. शहराच्या प्रत्येक भागात विविध समस्या आहेत. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्यास सदस्याला आमसभेत आवाज उठवण्याचा अधिकार आहे. महिन्यातून एकदाच होत असलेल्या आमसभेत गैरहजर राहून सदस्य तो अधिकारदेखील गमावत असल्याचे चित्र पालिकेत आहे. याचा फटका सामान्य अमरावतीकरांना बसत असून, शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असतानाही आमसभेत मात्र सदस्यांची मोठय़ा प्रमाणावर अनुपस्थिती असल्याने नागरिकांचे प्रश्नच मार्गी लागत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
41 सदस्य गैरहजर
सरत्या वर्षात 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष आमसभेत तब्बल 41 सदस्य अनुपस्थित होते. त्यानंतर 20 जून रोजी झालेल्या आमसभेत 28, तर 17 ऑगस्ट रोजी झालेल्या आमसभेत 25 सदस्य अनुपस्थित होते. लोकतंत्र प्रणालीचे महापालिकेतील सवरेत्तम सभागृह असलेल्या आमसभेत एवढय़ा सदस्याची अनुपस्थिती गंभीर बाब आहे.
एकाही सभेत सदस्यांची उपस्थिती शंभर टक्के नाही
सरत्या वर्षात झालेल्या 15 आमसभेपैकी एकाही सभेत सदस्यांची उपस्थिती शंभर टक्के नव्हती. सदस्यांची अनुपस्थिती ही गंभीर बाब असून, सर्वच पक्षांचे गटनेते तसेच पदाधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून समस्यांवर चर्चा होईल आणि शहर विकासासाठी मदत मिळेल.
उपस्थित हवीच..
प्रश्न असला, तर सदस्य आमसभेत उपस्थित राहतात. महत्त्वपूर्ण चर्चा होत असल्याने सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे. आमसभेत अनुपस्थित राहिल्याने विकास थांबत नाही. सक्रिय सदस्य असल्यास ते गटनेते आणि अधिकार्‍यांच्या मागे लागून कामे करवून घेतात, हे विशेषत्वाने सांगावे लागेल.
-बबलू शेखावत, पक्षनेता, काँग्रेस
लोकशाहीचा आत्मा
आमसभा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. सभेत नवीन धोरण निश्चित केले जाते, शासन तसेच प्रशासनाच्या प्रस्तावांवर अंमल करण्याबाबत निर्णय घेतले जातात. महापालिका प्रशासनाने केलेली चूक तसेच शहर, वॉर्डातील विषय मांडता येतात. त्यामुळे सदस्यांनी आमसभेत उपस्थित राहिलेच पाहिजे.
-संजय अग्रवाल, गटनेते, भाजप.
गटनेता म्हणून सूचना देतो
सदस्य आमसभेत नेहमीच गैरहजर नसतात. अडचण आल्यास उपस्थित राहणे शक्य होत नाही. असे असले तरी प्रत्येक पक्षातील प्रमुख लोक उपस्थित राहतात. अनुपस्थित असले म्हणजे जनतेप्रति प्रेम कमी होत नाही. गटनेता म्हणून आमसभेपूर्वी सर्व सदस्यांची बैठक घेतली जाते. त्यांना सूचना दिल्या जातात.
-अविनाश मार्डीकर, गटनेते, राष्ट्रवादी पक्ष