आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशे वाहनांचा ताफा; विश्रामगृहे बूक,महसूल यंत्रणा गर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- हरितक्रांतीचे प्रणेते तथा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होत असलेल्या शासकीय सोहळ्यासाठी महसूल यंत्रणा गर्क झाली आहे. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात एक ऑक्टोबरच्या सकाळी या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमाला सुरुवात होईल. यासाठी विविध कार्यालयांची दीडशेवर वाहने अधिग्रहित करण्यात आली. शुक्रवारपासूनच ती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेली असतील. दुसरीकडे शासकीय विश्रामभवनासह महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व इतर यंत्रणांची विश्रामगृहेही आरक्षित करण्यात आली आहेत. सुमारे तीन ते चार दिवस ही यंत्रणा महसूल खात्याच्या ताब्यात राहील.

जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझनहून अधिक मंत्री अमरावतीत येतील. सचिवालयातील अनेक अधिकारीही पोहोचणार आहेत. एक ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम व त्या दिवसापासूनच तीन दिवसीय प्रदर्शन असे हे संयुक्त आयोजन आहे. वाहनांचे पार्किंग आणि इतर बाबींसाठी सांस्कृतिक भवनाशेजारची महाविद्यालये व इतर इमारतींवरही महसूल यंत्रणेचाच ताबा राहणार आहे.

दहा वर्षांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण व संघटन अशा अनेक आघाड्यांवर चौफेर कामगिरी बजावली. त्या सर्व बाबींना उजाळा देऊन ती मूल्ये रुजवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या विविध विभागांमध्ये होणार्‍या या सोहळ्यांचा प्रारंभ अमरावतीतून होत आहे. त्यामुळे अमरावतीचा सोहळा भव्य-दिव्य होण्यासह चिरंतन स्मरणात राहावा, असे महसूल खात्याचे नियोजन आहे. त्यासाठी खाते कसर ठेवण्यास तयार नसून सर्व काही नियोजनाप्रमाणे पार पाडण्यासाठी सज्ज आहे.

दररोज 11 ते एक बैठक
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंह पवार यांच्या दालनात दररोज सकाळी 11 ते एक या वेळेत बैठक होणार आहे. विविध विभागांचे प्रमुख व महसूल यंत्रणेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीची ही श्रृंखला 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.