आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटकांनी उचलला लढण्याचा विडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-धनुर्विद्या, हँडबॉल, बॉलबॅडमिंटन अन् डॉजबॉल या खेळांचा प्रचार-प्रसार करण्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी घरदार विसरून आयुष्यातील उमेदीची वर्षे खर्ची घालणारे अमरावतील दोन क्रीडा संघटक सदानंद जाधव आणि डॉ. हनुमंत लुंगे यांना शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराची घोषणा झाली.

पुरस्काराने दोघांचाही उत्साह द्विगुणित झाला असून, ते खेळांच्या खाणीतील हिर्‍यांना पैलू पाडण्याचे काम नव्या जोमाने करण्यास सज्ज झाले आहेत. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची दोघांनाही जाणीव आहे. त्यामुळेच यापुढे खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी लढायचे, असा विडाही त्यांनी उचलला आहे.

सर्वच स्तरांतून अभिनंदन :
दोन्ही संघटकांनी खेळाच्या विकासाकरिता दिलेल्या सर्वोत्तम योगदानाची पावती म्हणून त्यांना राज्यातील उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्काराने शासनाने सन्मानित केले आहे. त्यांच्यावर अमरावतीच्या क्रीडाक्षेत्रासोबत सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, जिल्हा क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

ऑलिम्पिक पदक देणारा एकलव्य घडवायचाय : जाधव
घरच्या अंगणात लहान रोपट्यांचे संगोपन करून त्यांना फुलवतो तसेच क्रीडाक्षेत्रात अडीच ते पाच वर्षांपासूनच्या मुलांना धनुर्धर म्हणून घडवण्यासाठी सर्वस्व झोकणार आहे. यातूनच एखादा एकलव्य घडावा आणि त्याने देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून द्यावे, हीच माझी इच्छा आहे. यासाठीच मी प्रयत्न करणार आहे.

खेळाडूंना 25 गुण मिळवून देण्यासाठी झुंज : डॉ. लुंगे
संघटक म्हणून 25 वर्षे उशिरा का होईना, पुरस्कार मिळाला. यामुळे माझे धैर्य वाढले आहे. यापुढे विद्यापीठातील खेळाडूंना परीक्षेत 25 गुण मिळावेत म्हणून निकराची झुंज देण्यासाठी मी सज्ज झालो आहे. राज्यात सर्वत्र खेळाडूंना ही सुविधा असताना अमरावतीतच केवळ 10 गुण मिळतात. खेळाडूंना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल.