आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस वाहनाला निळे "अंबर दिवे' ; तातडीच्या आदेशानंतर झाली लगेच अंमलबजावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पोलिसांचे वाहन म्हटले की, एरवी चटकन लक्षात येतो तो त्यांच्या वाहनावर लागलेला केशरी अंबर दिवा. मात्र, आता हा केशरी अंबर दिवा बदलून त्याऐवजी निळा अंबर दिवा लावण्यात आला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी करत सर्व पोलिस वाहनांवरील अंबर दिवे बदलवण्यात आले आहेत.

पोलिसांच्या वाहनावर चकाकणारा केशरी दिवा आणि त्या वाहनातून वाजणारा सायरण या बाबी पोलिस वाहनांची गेल्या अनेक दिवसांपासूनची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपूवी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आरटीओ, पोलिस आणि महसूल या सर्व विभागांतील अधिकाऱ्यांच्या आणि इतर वाहनांवर असलेले केशरी अंबर दिवे काढून त्याऐवजी निळ्या रंगाचे अंबर दिवे लावण्याचे आदेश देण्यात आले होते.

या आदेशाची अंमलबजावणी करत आरटीओ विभागाने सर्वप्रथम त्यांच्या अधिकाऱ्यांच्या वाहनावरील दिवे बदलवून त्याऐवजी निळे दिवे लावले होते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना पोलिस दलाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून यासंदर्भात कुठलेही आदेश प्राप्त झाल्याने पोलिस वाहनावर मात्र, गेल्या काही महिन्यांपासून केशरी रंगाचे दिवेच कायम ठेवण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या आठवड्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी कार्यालयातून जिल्हा पोलिस दलाला एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानंतर सर्व पोलिस वाहनांवरील केशरी अंबर दिवे बदलून त्याऐवजी निळे अंबर दिवे लावण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिले होते. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत पोलिस विभागाच्या मोटार परिवहन विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील केशरी अंबर दिवे काढून त्याऐवजी निळ्या रंगांचे अंबर दिवे लावले आहे. त्यामुळे पोलिसांच्या वाहनांना नवा लूक मिळाला असल्याचे बोलल्या जात आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या वाहनावरही निळा दिवा
वाहनांवरीलअंबर दिवे बदलण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या या शासकीय वाहनावर असलेला केशरी दिवा काढून त्याजागी निळ्या रंगाचा अंबर दिवा लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांच्या वाहनावरीलही दिवा बदलवण्यात आला आहे. हे दिवे फारसे ओळखीचे नसल्याने हे वाहन नेमके कोणाचे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
केशरी दिव्यांचा वचक हरपणार
पोलिसवाहनावर असलेला आणि रात्रीच्या वेळी झगमग करत चकाकणारा केशरी दिवा दिसला की आरोपी आणि गुन्हेगारांमध्ये एक प्रकारची धडकी भरायची. त्यामुळे त्या केशरी दिव्याचा एक प्रकारचा वचक आरोपींवर असायचा. मात्र, आता हे केशरी दिवे बदलवण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी असलेल्या त्या केशरी दिव्यांचा वचकही हरवल्या जाणार आहे. तसेच नव्या निर्णयानुसार लावलेला निळा दिवा हा झगमणारही नाही. त्यामुळे पोलिसांच्या वाहनाचा सारा रुबाबच आता इतिहासजमा होणार आहे.