अमरावती - अमरावती विभागाच्या पोलिस बिनतारी संदेश यंत्रणेचे प्रमुख, पोलिस उपअधीक्षक नितीन जुवेकर यांनी सोमवारी दारूच्या नशेत कार्यालयातच ‘लोटांगण’ घातले. बराच वेळ त्यांचा गोंधळ सहन केल्यानंतर कनिष्ठ सहका-यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली व तेथील पोलिसांनी अक्षरश: उचलबांगडी करून जुवेकर यांना गाडीत टाकून नेले. दरम्यान, मद्यपी जुवेकर यांचा हा गोंधळ नेहमीचाच झाल्याची तक्रार या कार्यालयातील कर्मचा-यांनी केली.
पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मागील बाजूला अमरावती परिक्षेत्राचे पोलिस बिनतारी संदेश यंत्रणेचे कार्यालय आहे. या कार्यालयात २०१२ पासून पोलिस उपअधीक्षक या पदावर नितीन जुवेकर हे कार्यरत आहेत. ते अनेकदा कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत येतात व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी असभ्य भाषेत बोलतात, गैरवर्तन करतात, असे येथील कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
सोमवारी सकाळी ११.३० वाजेदरम्यान जुवेकर दारूच्या नशेतच कार्यालयात आले, त्यांना धड चालताही येत नव्हते. प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्याने त्यांना
आपण काय करतोय याचेही भान नव्हते. दालनात प्रवेश केल्यावर त्यांनी खुर्चीऐवजी थेट जमिनीवरच बैठक ठोकली. तोल सावरता येत नसल्याने ते जमिनीवरही पडत होते. सहका-यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दाद देत नव्हते. अखेर पोलिसांनाच पाचारण करावे लागले.
वरिष्ठांकडून अभय
‘बिनतारी यंत्रणेचे महासंचालक (पुणे) व आणि पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे आम्ही मद्यपी जुवेकरांची यापूर्वी तक्रार केली होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही’, असे याच कार्यालयातील एका अधिका-याने पत्रकारांना सांगितले.
कारवाई होणारच
उपअधीक्षक जुवेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कारवाई करतील, त्या कारवाईचा आम्हाला अहवाल प्राप्त होईलच, त्या अहवालावरून नियमाने जी कारवाई करायची आहे, ती आम्ही करणार आहोत.
श्री. सोनोने, अधीक्षक, बिनतारी संदेश, नागपूर.
वैद्यकीय चाचणीतही मद्य घेतल्याचे उघड
आम्ही जुवेकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये जुवेकर यांनी मद्य घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ८५ अन्वये तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक साखरे यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
डी. सी. खंडेराव, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा.
पुढे पाहा कशी त्या डीवायएसपीची उचलबांगडी करण्यात आली..