आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहर विकासाला मिळणार नियोजनाची नवीन ‘दृष्टी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- 2025 पर्यंत अमरावती शहराचा विस्तार लक्षात घेऊन इतर महानगरांच्या धर्तीवर महापालिकेत विकास आराखडा सादर केला जाणार आहे. शहर विकासाबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रस्ताव सादर केला असून, यावर आगामी आमसभेत चर्चा अपेक्षित आहे.

महापालिका अस्तित्वात येऊन 30 वर्षे झाली आहेत. या कालावधीत शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. नियोजनअभावी शहर इतर महानगरांच्या तुलनेत पिछाडीवर पडले. अनियंत्रित विकास झाला. सहायक संचालक नगर रचना विभागाने ठरवले, त्याच भागात नवीन ले-आउट निर्माण झाले. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या ले-आउटमध्ये आजही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा असताना नवीन ले-आउटला मंजुरी देताना विकासाबाबत कोणताही दृष्टिकोन ठेवण्यात आला नाही. विकासाबाबत ‘व्हिजन’ नसल्याने नव्याने झालेली अर्धी अमरावती प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे.

वर्षात नव्याने 40 ले-आउट
महापालिका क्षेत्रात रहिवासी क्षेत्र म्हणून एका वर्षात किमान 30 ते 40 नवीन ले-आउटला सहायक संचालक नगर रचना विभागाकडून मंजुरी दिली जाते. मात्र, महापालिका नियोजनाक कमी पडत आहे. शहराचा झपाट्याने विकास होत असताना त्यात ‘व्हिजन’ नसल्याने प्राथमिक सुविधांचा अभाव दिसून येतो.

असा आहे प्रस्ताव
शहर विकासाचे ‘व्हिजन’ देणारा प्रस्ताव 241 या क्रमांकाने दाखल करण्यात आला आहे. ‘अमरावती शहरात होत असलेल्या नवीन ले-आउटमध्ये विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टीने एनआयटी, नागपूर किंवा सिडको, मुंबई यांच्या धर्तीवर विकासासाठी उपाययोजना करणे’ या आशयाचा तो प्रस्ताव आहे.

यासाठी ‘व्हिजन’
अमरावती महापालिका क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असताना, शहर सुंदर आणि स्वच्छ दिसेल, या दृष्टीने विचार केलेला दिसून येत नाही. नागपूर, औरंगाबादप्रमाणे अमरावती शहरातदेखील विकासाच्या दृष्टीने आराखडा ठरवण्याची गरज आहे. हा प्रस्ताव त्या अनुषंगाने ‘व्हिजन’ देणारा ठरणार आहे. अविनाश मार्डीकर, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

पालिकेच्या नगर रचना विभाग कार्यालयाला उपसंचालक दर्जाचे अधिकारी हवे आहेत. पालिकेत सहायक संचालक नगर रचना दर्जाचा अधिकारी असल्याने विकासाची दृष्टीच मिळाली नाही. मागील 30 वर्षांमध्ये विकासाबाबत जे शक्य झाले नाही, त्याची पुनरावृत्ती आगामी काळात होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर यांनी शहराच्या विकासाला नवीन दृष्टी देणारा प्रस्ताव ठेवला आहे. याला सभागृहातून प्रतिसाद मिळाला. या सकारात्मक प्रस्तावास माजी स्थायी समिती सभापती चेतन पवार, सुनील काळे, चरणजित कौर नंदा, जयर्शी मोरे, ममता आवारे आदी नगरसेवकांनी अनुमोदन केले आहे.

नवीन ले-आउटमध्ये सर्व्हिस गल्ली राहणार नाही. त्याचप्रमाणे भुयारी गटार योजनेचे काम त्या भागात कधी केले जाणार, हे अनिश्चित आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणार्‍या शहरात सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा अनेक असुविधांचा सामना सर्मथपणे करता यावा म्हणून नवीन व्हिजन देण्याची गरज आहे.

याला बसेल आळा
सक्षम प्राधिकरण नसल्याने 0.39 आर प्रकरण, वहिवाट प्रकरण, पालिकेला मिळालेल्या भूखंडांचा घोटाळा ही प्रकरणे गाजली. नवीन दृष्टी लाभल्याने याला आळा बसेल.