आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात ‘सायलेन्स झोन’ गायब; यंत्रणा तंद्रीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मुंबई उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर महापालिकेने शहरातील 478 ठिकाणे ‘सायलेन्स झोन’ (ध्वनिप्रतिबंधित क्षेत्र) घोषित केली. यापैकी कोणत्याही ठिकाणी ध्वनिप्रदूषणाला पायबंद घालणार्‍या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. विशेष असे, की 26 फेब्रुवारी 2009 च्या न्यायालयीन निर्देशानुसार निश्चित झालेल्या या ठिकाणांचा खुद्द महापालिकेला विसर पडला, तर पोलिस यंत्रणा आपल्याच तंद्रीत आहे.

शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, न्यायालये आणि मंदिर-मशीद-चर्च-गुरुद्वारा यासारखी धार्मिक स्थळे ध्वनिप्रदूषणापासून मुक्त राहावीत, यासाठी काही कायदे आहेत. पोलिस यंत्रणेच्या लेखी परवानगीनंतर विशिष्ट परिस्थितीत आणि तेही विशिष्ट वेळांमध्येच सौम्य आवाजात ध्वनिक्षेपणाला मुभा आहे. परंतु, या बाबींचे सर्रास उल्लंघन होत आहे. महापालिकेच्या यादीनुसार शहराच्या चार झोनमध्ये 478 ठिकाणे सायलेंस झोन म्हणून निर्देशित आहेत. शाळा-महाविद्यालये, रुग्णालये व धार्मिक संस्था यात मोडणार्‍या या सर्व ठिकाणांना मिळून महापालिकेने तब्बल 353 ठिकाणी ध्वनिप्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावल्याचे सांगितले जाते. परंतु, किती ठिकाणी फलक आहेत, याची माहिती यंत्रणेलाच नसल्याने महापालिका फक्त कर गोळा करायसाठीच का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांनी लेखी परवानगी दिल्यानंतर विशिष्ट तीव्रतेपर्यंत ध्वनिक्षेपण करता येते. त्यातही रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत वाद्यवृंद वाजवताच येत नाही, असे कायदा म्हणतो. परंतु, या बाबीचे सर्रास उल्लंघन होते

...तर कारवाई निश्चितच
किती डेसीबलपर्यंत ध्वनी वाजविता येईल, हेही ठरलेले असते. याऊपरही कुणी उल्लंघन केले तर त्या-त्या मंडळांवर कारवाई करता येईल. विशेष शाखा व वाहतूक शाखा या विभागातून हा पत्रव्यवहार केला जातो. त्यामुळे तक्रारी स्वीकारणे आणि कारवाई करणे हे त्यांच्याच कक्षेत मोडते. लतीफ तडवी, सहायक पोलिस आयुक्त, अमरावती.

विधी महाविद्यालयातच धिंगाणा
ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून दहा कायदे आहेत. कायद्याचे शिक्षण देणार्‍या संस्थेतच उल्लंघन केले गेले. आमदार प्रवीण पोटे मित्रमंडळातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय परिसरात दहीहंडी स्पर्धा घेतली.दिवसभर वाद्यवृंद व लावणीवर नृत्याचा धिंगाणा सुरू होता. कायद्याची जडणघडण होणार्‍या ठिकाणीच हे असे सुरू होते. आता बोला!

100 मीटरचे क्षेत्र
सायलेंस झोनची व्याख्या केवळ संबंधित ठिकाणापुरती र्मयादित नाही. त्या ठिकाणाच्या 100 मीटर परिघातील क्षेत्राचा समावेश आहे. अर्थात ध्वनिप्रदूषण राखायचे म्हणजे 100 मीटर परिघात शांतता नांदावी, याची खबरदारी घ्यावी लागते; अन्यथा वर उल्लेखित विविध कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई करता येते.

अंमलबजावणीची हीच वेळ
सोमवारपासून गणेशोत्सवाची धूम सुरू होत आहे. सार्वजनिक व घरगुती अशा दोन्ही पातळ्यांवर हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवानंतर शारदोत्सव व नवरात्राचे पर्व सुरू होते. या काळात ध्वनिप्रदूषणाची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.