आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे जिल्हाधिकार्‍यांकडूनच उल्लंघन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चारचाकी वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत. न्यायालयाच्या या आदेशांचे जिल्हाधिकार्‍यांसह अनेक अधिकार्‍यांनी सर्रास उल्लंघन केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना जिल्हा दंडाधिकारी (मॅजिस्ट्रेट) म्हणून अधिकार आहेत. न्यायिक अधिकार असल्याने न्यायापालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन होतेय की नाही, हे तपासण्याची जबाबदारी सर्वप्रथम त्यांच्यावरच येते. परंतु, महिवाल यांच्या शासकीय वाहनाच्या काचांनाच काळी फिल्म चढवण्यात आली आहे.

महिवाल यांच्या शासकीय वाहनाव्यतिरिक्त महसूल, पोलिस, विभागीय आयुक्तालय, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वनविभागातील वाहनांना काळी फिल्म आहे.

काळे काचच नसलेली वाहने
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येताच अमरावतीचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या शासकीय वाहनाचे काचच बदलले होते. त्यामुळे आयुक्तांच्या वाहनाचे काच आजही पारदर्शकच आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय वाहनाचे काच टिन्टेड आहेत. आरटीओच्या वाहनांच्या काचांबद्दलही साशंकता आहे.

असा असतो टिन्टेड काच
टिन्टेड काच हा पूर्णपणे काळा असतो. उलट काचावर काळी फिल्म लावली असेल, तर काचाची वरील बाजू अध्र्या सेंटीमीटरपर्यंत पूर्णपणे पारदर्शक असते, त्यानंतरचा पूर्ण काच काळा दिसतो. ही फिल्म स्वस्त मिळते. ती लावल्यानंतर कारचे काच जणू काही टिन्टेड आहेत, असे भासते.