आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांनी घ्यावा जिल्हाधिकार्‍यांचा आदर्श

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शासकीय वाहनाच्या काचांवर लागलेल्या काळ्या फिल्मबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी तातडीने ही फिल्म काढून टाकली आहे. शासकीय वाहनावर काळी फिल्म असेल, तर ती काढली जाईल, अशी भूमिका महिवाल यांनी घेतली होती. आरटीओने सूचना दिल्यानंतर ताबडतोब त्यांनी फिल्म काढण्याबाबत सूचनाही दिली. परंतु, या प्रक्रियेत प्रशासकीय दिरंगाई आडवी आली होती.

वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावण्याची परवानगी कुणालाही नाही. त्यातून कुणालाही सूट नाही. आपल्या वाहनाच्या काचांवर काळी फिल्म असेल, तर ती काढली जाईल, अशी सकारात्मक भूमिका राहुल रंजन महिवाल यांनी घेतली होती. काचेवरील काळी फिल्म काढत त्यांनी अधिकार्‍यांपुढे चांगला पायंडा पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महिवाल यांच्याप्रमाणे जिल्ह्यातील अन्य महसूल अधिकार्‍यांनी आपल्या वाहनांवरील काळ्या फिल्म काढण्यासाठी पुढाकार घेण्याची आता गरज आहे. इतकेच नव्हे, तर अंबर दिवा आणि लाल दिव्याच्या बाबतही अलीकडेच राज्य सरकारने कडक दिशानिर्देश दिले आहेत. त्याचे पालन करण्यासाठीही अधिकार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. महिवाल यांचा आदर्श घेत उर्वरित विभागप्रमुखांनीही असाच सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.