आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Corporation Commissioner In Pune For DCR Training

अमरावतीचे आयुक्त पुण्यात तरीही महापालिकेत दरारा कायम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार विकास नियंत्रण नियमावलीच्या (डीसीआर) कार्यशाळेनिमित्त पुण्यात असले; तरीही त्यांचा दरारा शनिवारी महापालिकेत दिसून आला. त्यांच्या अनुपस्थितही कार्यालयीन शिस्त राखल्याचे चित्र पहिल्यांदाच महापालिकेत दिसून आले.
एरवी महापालिका आयुक्त नाहीत, तर कसेही वागले तरी चालते, असे यापूर्वी बव्हंशी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाटत होते. शनिवारच्या वागण्यात मात्र ही उणीव दिसून आली नाही. बहुतेक विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहोचले. त्यामुळे नागरिकांची कामेही सुरळीतपणे पुढे गेलीत.
आयुक्तांच्या या दराऱ्याचे सामान्य नगरसेवकांसह नागरिकांनी कौतुक केले असून, गडबड करणाऱ्या नगरसेवकांसाठी मात्र ते अडचणीचे ठरले आहे. विशेषत: प्रत्येक गटात तडजोड करण्याचा अप्रत्यक्ष कंत्राट घेतलेल्या काही नगरसेवकांसाठी ते कमालीच्या अडचणीचे ठरले असून, त्या सर्वांची मोठी गोची झाली आहे.

बदलले वातावरण

उठसूट कोणत्याही मुद्द्यावर अधिकाऱ्यांना बोलावण्यात काही पदाधिकाऱ्यांना धन्यता वाटे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांत बऱ्यापैकी लगाम लागला. आपण सांगत असलेले काम बेकायदा तर नाही ना, याची खात्री नसल्याने असे झाले असावे, असा काहींचा अंदाज आहे. दुसरीकडे बहुतेक अधिकाऱ्यांचा वेळ आयुक्तांच्या निर्देशांनुसार काम करण्यातच जातो, हेही यामागचे कारण आहे.

शहरभर आयुक्तांचीच चर्चा

शहरातील प्रत्येकाला जन्मदाखल्यापासून मृत्यूपर्यंतचे सोपस्कार, घरबांधणी, नळ कनेक्शन, वीजपुरवठा आदींसाठीही मनपात जावेच लागते. त्यामुळे येथे येणारे अनुभव हे नागरिकांच्या लक्षात राहतात. गुडेवारांमुळे आता वाईट अनुभवही येणार नाहीत, असा विश्वास वाटत आहे.

आज परतणार आयुक्त

‘ड’वर्ग महापालिकांची विकास नियंत्रण नियमावली एकसमान असावी, असा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच शनिवारी पुण्यात बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक आटोपून रविवारी सायंकाळी ते अमरावतीकडे निघतील. त्यामुळे उद्या, सोमवारी आमसभेला ते उपस्थित राहतील. रुजू झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच आमसभा आहे.