आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० पेक्षा जास्त शाखांचे सहाशेवर कर्मचारी संपावर, जिल्हा बँकेचे कामकाज ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेला महागाई भत्ता लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे सहाशेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संप पुकारला. या आंदोनलनामुळे बँकेच्या ८० पेक्षा जास्त शाखांचे कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अमरावती गाठून इर्विन चौकातील बँकेच्या मुख्यालयासमोर धरणे निदर्शने केली.

खरीप हंगामासाठीचा कर्ज प्रस्ताव तयार करण्याची वेळ सुरु होत असतानाच एडीसीसीच्या सहाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पुरेशा पोलिस बंदोबस्तात सुरु झालेल्या या आंदोलनामुळे दिवसभर इर्वीन चौकात निवडणुकीसारखा माहोल होता. संपकरी अधून-मधून घोषणा देत होते. परंतु सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघाला नव्हता.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्रजकिशोर टेकाडे, कार्याध्यक्ष अनंत सोमवंशी सरचिटणीस प्रभाकर किलोर आदींच्या नेतृत्त्वात सुरु झालेल्या या संपात जिल्हाभरातील अधिकारी (व्यवस्थापक) कर्मचारी सहभागी झाले आहेत. दुपारपर्यंत बहुतेक सर्वच शाखांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यामुळे कोणत्याही शाखेत आज कामकाज झाले नाही, असा कर्मचारी संघटनेचा दावा आहे. २०११ पासूनचा महागाई भत्ता लागू करा, ही बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठीच त्यांनी संप पुकारला आहे.
बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही बँक व्यवस्थापनाने हेतूपुरस्सर हा निर्णय राखून ठेवल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस किलोर यांनी केला आहे. त्यांच्यामते केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्ता बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असतो. त्यामुळे तो त्या-त्या वेळी दिला गेला पाहिजे. परंतु गेल्या चार वर्षांपासून हा नियम बासनात गुंडाळला गेला. बँक व्यवस्थापनाच्या हेकेखोर भूमिकेमुळे हा प्रकार उद्भवला असून मागण्या मान्य होईस्तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, विदर्भात सर्वाधिक पगार...
बातम्या आणखी आहेत...