आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Lok Sabha Constituncy News In Marathi, Divya Marathi, Rana, Adsul

अडसूळ, देवपारे, राणा आणि गवई यांच्यात चौरंगी लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात उमेदवारी देण्यापासून चर्चेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत कौर राणा आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी ठेवून कोणताही वाद न ठेवता, आनंदराव अडसूळ यांच्यासाठी एकत्रितपणे काम करणारी शिवसेना-भाजप महायुती, या दोघांपुढेही रिपाइं, भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई आणि बसपचे गुणवंत देवपारे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. सुरुवातीच्या काळात अडसूळ आणि राणा या दोन उमेदवारांमध्ये दिसणारी लोकसभेची ही निवडणूक आता मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चौरंगी झाली आहे. या निवडणुकीत या चारही उमेदवारांनी एकमेकांना आपआपल्या प्राबल्य असलेल्या भागात चांगलीच लढत दिली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर आणि मेळघाट या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण लढतीत असलेल्या 19 पैकी या चार उमेदवारांमध्ये लढत असल्याची चर्चा आहे. आम आदमी पार्टीच्या प्रा. भावना वासनिक यांनीही जिल्हय़ात घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला.
नमोंच्या सभेनंतर लढत ठरली लक्षवेधी
नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर लोकसभेची ही निवडणूक राष्ट्रीय मुद्दय़ावर प्रभावी ठरेल, अशी आशा महायुतीला आहे. महायुतीमधील रामदास आठवले यांचा आंबेडकरी विचारांच्या मतदारांमध्ये प्रभाव आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांचीही साथ महायुतीला मिळाली आहे. या सर्व समीकरणांचा अडसूळ यांना कसा उपयोग होतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
घरोघरी प्रचारावर भर
डॉ. राजेंद्र गवई हे रिपाइंच्या तिकीटावरच मैदानात उतरले आहेत. भारिप-बहुजन महासंघ आणि प्रहार संघटना या दोघांचीही त्यांना साथ आहे. काँग्रेसने साथसंगत न केलेल्या आणि तिरंगी झालेल्या अटीतटीच्या लढतीतही गवई कुटुंबातील सदस्याच्या पारड्यात दीड लाख मते अमरावतीकरांनी टाकली आहेत. गवई यांच्या उमेदवारीने अडसूळ आणि राणा यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
राकाँसाठी प्रतिष्ठेची लढत
नवनीत कौर राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणारे राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांची पक्षाने हकालपट्टी केली. दुसरीकडे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संवाददरी दूर झाल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हय़ात सभा घेतल्या. त्यामुळे राणा दाम्पत्याने संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना-भाजपापुढे एक आव्हान निर्माण केले आहे. ही वस्तुस्थिती आहे.