आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Lok Sabha Constituncy News In Marathi, Lok Sabha Election

अमरावती लोकसभेचे तीन महिलांनी केले प्रतिनिधित्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लोकसभेसाठी अमरावती मतदारसंघातून आतापर्यंत झालेल्या निवडणुकीतून तीन महिला उमेदवार संसदेत पोहोचल्याचा इतिहास आहे. विमलताई पंजाबराव देशमुख, उषाताई प्रकाश चौधरी आणि प्रतिभा देवीसिंह पाटील या त्या तीन उमेदवार होत.


पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून (1951) आजपर्यंत लोकसभेच्या पंधरा निवडणुका पार पडल्या आहेत. या व्यतिरिक्त अमरावती मतदारसंघात 1965 मध्ये लोकसभेची एक पोटनिवडणूक झाली होती. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या या पोटनिवडणुकीत विमलताई देशमुख विजयी झाल्या होत्या. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उषाताई चौधरी यांच्याविरोधात रिपाइंच्या कमलताई गवई रिंगणात होत्या. यामध्ये अमरावतीकरांनी उषाताई चौधरी यांच्या बाजूने कौल दिला होता. 1984 मध्येही उषाताई चौधरी यांनी शरद तसरे यांचा पराभव करत नवी दिल्ली गाठली होती. मात्र, त्यानंतर 1989 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदामकाका देशमुख यांनी उषाताई चौधरी यांचा पराभव केला. या पराभवामुळे उषाताईची विजयाची हॅटट्रिक हुकली. 1991 मधील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा देवीसिंह पाटील या शिवसेनेचे प्रकाश पाटील भारसाकळे यांना पराभूत करून लोकसभेवर पोहोचल्या होत्या. नंतरच्या काळात त्यांनी राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली. 2007 मध्ये देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याचा बहुमान त्यांना लाभला होता. 1991 पासून बावीस वर्षांत अमरावती मतदारसंघातून एकही महिला उमेदवार लोकसभेवर निवडला गेला नाही.


वर्ष खासदाराचे नाव पक्ष
1951 डॉ. पंजाबराव देशमुख काँग्रेस
1951 कृष्णराव देशमुख काँग्रेस
1957 डॉ. पंजाबराव देशमुख काँग्रेस
1962 डॉ. पंजाबराव देशमुख काँग्रेस
1965 विमलताई देशमुख काँग्रेस
1967 कृष्णराव देशमुख काँग्रेस
1971 कृष्णराव देशमुख काँग्रेस
1977 नानासाहेब बोंडे काँग्रेस
1980 उषाताई चौधरी काँग्रेस
1984 उषाताई चौधरी काँग्रेस
1989 सुदामकाका देशमुख सीपीआय
1991 प्रतिभाताई पाटील काँग्रेस
1996 अनंत गुढे शिवसेना
1998 रा. सू. गवई रिपाइं
1999 अनंत गुढे शिवसेना
2004 अनंत गुढे शिवसेना
2009 आनंदराव अडसूळ शिवसेना