आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Lok Sabha Seat News In Marathi, Electronic Voting Machine

कोणत्या बटणवर कोणता उमेदवार, आज होणार निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला कोणता क्रम मिळेल, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असले तरी इव्हीएमवर कोण कोठे राहील, याची मांडणी जवळपास पूर्णत्वास आली आहे. हीच मांडणी कायम राहिल्यास शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे पहिल्या, बसपचे गुणवंत देवपारे दुसर्‍या, तर राकाँच्या नवनीतकौर राणा इव्हीएमवर तिसर्‍या क्रमावर असतील. निवडणूक यंत्रणेमार्फत या मुद्दय़ावर बुधवारी (दि. 26) अधिकृत शिक्कामोर्तब होईल.
निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे. दुपारी तीनपर्यंत ही प्रक्रिया चालेल. त्यानंतरच उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होईल. यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप केले जाणार असून, त्याच वेळी इव्हीएमवरील त्यांचा क्रमही अंतिमरीत्या निश्चित केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या सूचनेनुसार, उमेदवारांच्या पक्षांचा दर्जा आणि उमेदवारांच्या नावांची मराठी वर्णाक्षरे लक्षात घेऊन हा क्रम निश्चित केला जातो. विशेष असे, की हा क्रम लावताना उमेदवारांचा पक्ष राष्ट्रीय की राज्यस्तरीय व नोंदणीकृत की अनोंदणीकृत, हे पहिल्यांदा लक्षात घेतले जाते. शिवाय प्रत्यक्ष नावापेक्षा इव्हीएमवर (मतपत्रिका) वेगळे नाव देण्याची संधी असल्यामुळे, ते जे नाव सांगतील, त्या नावांची वर्णाक्षरेही लक्षात घेतली जातात.


आठ एप्रिलला बंद होणार जाहीर प्रचार : अमरावतीसह विदर्भात तिसर्‍या टप्प्यात 10 एप्रिलला मतदान होत आहे. मतदानाची प्रक्रिया संपण्याच्या 48 तास आधी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. मतदान 10 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता संपेल. त्यामुळे जाहीर प्रचार आठ एप्रिलच्या सायंकाळी सहा वाजता संपुष्टात येईल.


अपक्षांची मोठी कोंडी : नामांकन भरल्याच्या दिवसापासून उमेदवारांनी प्रचार सुरू केला. पक्षीय उमेदवारांची चिन्हे ठरलेली असतात. त्यामुळे उमेदवारी निश्चितीपासूनच ते प्रचाराला लागले. मात्र, अपक्षांना जोपर्यंत चिन्ह मिळत नाही, तोपर्यंत ते प्रचार सुरूच करू शकत नाहीत. अशा उमेदवारांनी केवळ 12 दिवसांत काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरा प्रचार उद्यापासूनच
खरा प्रचार चिन्ह प्राप्त झाल्यापासूनच सुरू होतो. त्यामुळे गुरुवारपासून (दि. 27) उमेदवार जाहीर प्रचाराला लागणार आहेत. मतदान संपण्याच्या 48 तास आधी तो बंद करावा लागतो. त्यामुळे 26 मार्च ते आठ एप्रिल हा अवघा बारा दिवसांचाच कालावधी उमेदवारांना प्राप्त होत आहे. हा बारा दिवसांचा प्रचार नेमके कोणाचे ‘बारा’ वाजवतो आणि कोणाला थारा देतो, हे येणारा काळच सांगणार आहे.


तयारी अंतिम टप्प्यात
निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेली संपूर्ण तयारी झाली आहे. माघार घेण्याचा अंतिम दिवस बुधवार आहे. किती जण माघार घेतील, हे त्यावेळी स्पष्ट होईल. परंतु, रिंगणातील उमेदवारांची संख्या 16 पेक्षा जास्त असल्यास आम्हाला प्रत्येक केंद्रावर दोन इव्हीएमची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठीची तयारीही सुरू आहे. राहुल महिवाल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, अमरावती.