आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Lok Sabha Seats News In Marathi, Rahul Ranjan, Divya Marathi

लोकसभेसाठी 19 उमेदवारांमध्ये रणसंग्राम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. अंतिम दिनी 11 उमेदवारांनी माघार घेतली. उर्वरित उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाल्याने निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे.


निवडणुकीसाठी 33 नामांकन प्राप्त झाले होते. तीन अवैध ठरल्यानंतर 30 नामांकन कायम होते. 30 मधून 11 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. आता प्रचारास सुरुवात झाल्याने प्रत्येक उमेदवारावर लक्ष राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पाच मार्चपासून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली असून, आतापर्यंत आचारसंहिता भंग केल्याच्या पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावे म्हणून मतदान यादी दुरुस्त करणे तसेच डाटा एंट्री करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे महिवाल म्हणाले. आचासंहितेचा भंग केल्याच्या तक्रारींची गंभीर दखल निवडणूक आयोगाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीदरम्यान तैनात कर्मचार्‍यांकरिता 30 मार्च तसेच आठ एप्रिल रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडत स्वयंस्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी केले. मतदान जनजागृतीसाठी फेरी काढली जाणार आहे. मतदान कमी नोंदवले गेलेल्या भागामध्ये जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे उपस्थित होते.


रिंगणातील उमेदवार
आनंदराव अडसूळ (शिवसेना), गुणवंत देवपारे (बसप), नवनीत रवि राणा (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्योती माकोडे (आंबेडकराइड पार्टी ऑफ इंडिया), भावना वासनिक (आप), डॉ. राजेंद्र गवई (रिपाइं गवई), रमेश रामटेके (रिपाइं खोब्रागडे), सुनील डेव्हिड (बहुजन मुक्ती पार्टी), तर अपक्ष म्हणून संजय आठवले, आशा अभ्यंकर, किरण कोकाटे, ज्योती देवकर, प्रिया डोंगरे, अँड. बंड्या साने, मनोहर सोनोने, राजू सोनोने, राजू मानकर, विश्वनाथ जामनेकर, हरिदास सिरसाठ यांचा समावेश आहे.

यांची माघार
मनसेचे संजय गव्हाळे, नारायण घनगाव, अँड. सुनील गजभिये, शेषराव वानखडे, राहुल मोहोड, मिलिंद लोणपांडे, केशव वानखडे, पवन बोरकर, अशोक पासरे, पंकज मेश्राम आदी 11 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तीन नामांकन अवैध ठरल्याने 19 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.