अमरावती - शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई मशीनद्वारे होत असल्याचे चित्र लवकरच अमरावतीकरांच्या दृष्टीस पडणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेनंतर केवळ अमरावती महापालिकेने ‘रोड व्हॅक्यूम स्वीपर मशीन’ रस्त्यावर उतरवली आहे. शनिवारी काँग्रेसनगर येथे या स्वीपर मशीनचे प्रात्यक्षिकासह आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
महापालिका क्षेत्रामध्ये झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे आरोग्य विभागावर शहर स्वच्छतेचा ताण वाढत आहे. कर्मचार्यांच्या अपुर्या संख्येमुळे नगरसेवक व नागरिकांची कायम ओरड असते. या पार्श्वभूमीवर किमान मुख्य रस्त्यांची स्वच्छता मशीनद्वारे राखणे शक्य होईल काय, याचा आयुक्त अरुण डोंगरे यांनी आढावा घेतला. मुंबईतील प्रमुख मार्गांच्या स्वच्छतेसाठी या प्रणालीचा वापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार लुधियाना येथून ही मशीन मागवण्यात आली असून, कंपनीचे सुनील कुमार प्रशिक्षण देत आहेत.
अशी आहे मशीन : स्वीपर मशीन ट्रकवर आरूढ आहे. वाहनाच्या खालच्या बाजूस सफाई करणारे मोठे ब्रश आहेत. व्हॅक्युम तंत्राद्वारे रस्त्यावरील कचरा आत खेचला जातो. फूटपाथही स्वच्छ केले जाऊ शकते. वाहनाच्या पुढील व मागील बाजूस लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांमधून रस्त्याची स्वच्छता झाली किंवा नाही, हे तत्काळ कळते.
15 मिनिटात एक किलोमीटर मार्ग स्वच्छ
स्वीपर मशीन 15 ते 20 मिनिटांत एक किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करते. रस्त्यांवरील कचरा खेचण्याची किमया मशीन साधते. ही मशीन पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर सफाई कामगारांना अंतर्गत भागातील सफाईची कामे दिली जातील.