आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation News In Marathi, Divya Marathi, Collector

मिनी महापौर निवडणूक ब‍िनविरोध पार पडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी 11 वाजता रामपुरी कॅम्प झोन क्रमांक एकसाठी निवडणूक झाली. झोन क्रमांक एक ते पाचसाठी अर्धा तासांच्या फरकाने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. पक्षीय बलाबल लक्षात घेता दोन जागा काँग्रेस, दोन राकाँ, तर एक जागा शिवसेना-भाजपच्या वाट्याला देण्यात आली आहे. एक वर्ष कालावधी असलेली झोन सभापती निवडणूक सामोपचाराने व्हावी म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समझौता झाला आहे. आज झालेल्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्यावर कायम असल्याचे दिसून आले.


झोन क्रमांक एकचा निकाल घोषित झाल्यानंतर शिवसेना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवत आतषबाजी करीत जल्लोष केला. या वेळी विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, भाजप गटनेते संजय अग्रवाल, तुषार भारतीय, अजय सामदेकर, अमोल निस्ताने, नगरसेविका स्वाती निस्ताने, नगरसेविका सुवर्णा राऊत, सुनील राऊत, नगरसेविका रेखा तायवाडे, वनिता तायडे, पंजाबराव तायवाडे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या निवडून आलेल्या मिनी महापौर शाहिस्ता अन्सारी जिशान अन्सारी, हफिजाबी युसूफ शाह यांचे स्वागत महापौर वंदना कंगाले यांच्या कक्षात सदस्यांकडून करण्यात आले. यावेळी गटनेते बबलू शेखावत, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, राजेंद्र महल्ले, विलास इंगोले यांच्यासह कॉंग्रेसचे सर्वच नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस फ्रंटचे मिनी महापौर जावेद मेमन, शमीमबानो सादिक आयडीया यांचे स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्या कक्षात स्वागत करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगर सचिव विभागातील कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


व्हीप पाळला : मिनी महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस फ्रंटचे गटनेते अविनाश मार्डीकर यांनी काल व्हीप जारी केला होता. एक वगळता सर्वच नगरसेवक निवडणुकीदरम्यान उपस्थित असल्याने मार्डीकर यांनी काढलेला व्हीप गटातील बहुतांश नगरसेवकांनी पाळला असल्याचे दिसून आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस फ्रंटचे दोन मिनी महापौर देखील अविरोध निवडूण आले.


महायुतीचे ताशे अन् कॉंग्रेसची चुप्पी
मिनी महापौर निवडणुकीत केवळ शिवसेनेचे राजू मानकर यांचा विजय झाल्यानंतर आतषबाजी करण्यात आली तसेच ढोल-ताशे वाजविण्यात आले. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणताही गाजावाजा करण्यात आला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा परिणाम आगामी दिवसांमध्ये दिसणार असून त्यातून महापालिकेत सत्तांतर देखील कोण्याची अधिक शक्यता आहे. महायुतीचे ताशे अन् कॉंग्रेसची चुप्पी अशी दोन्ही कॉंग्रेसमधील सामसुमीची चर्चा महापालिकेत रंगली होती.