आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती महापालिकेत खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - थकीत वेतनाबाबत झालेल्या बैठकीत महापालिका उपायुक्त रामदास सिद्धभट्टी आणि कर्मचारी संघाचे प्रल्हाद कोतवाल यांच्यात गुरुवारी खडाजंगी झाली. आयुक्तांसमोर उपायुक्तांच्या अशा वर्तणुकीमुळे नाराज कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीतून बाहेर जात निषेध नोंदवला.

दरम्यान, अधिकारी-कर्मचारी युनियनच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर शुक्रवारी (दि. 20) एका महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. महानगरपालिका कर्मचारी/कामगार संघ आणि अमरावती महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी युनियनने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन न मिळाल्याने संपाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्त अरुण डोंगरे यांनी गुरुवारी दोन्ही कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक बोलावली. दुष्काळनिधीच्या विषयावर कर्मचारी संघाने काढलेल्या प्रसिद्धी पत्राबाबत या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. याच मुद्दय़ावरून उपायुक्त सिद्धभट्टी आणि कोतवाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांनी उठून जात सिद्धभट्टी यांच्या वर्तणुकीचा निषेध केला. महापालिकेच्या आवारात एकत्र येत सिद्धभट्टी तसेच मुख्य लेखापरीक्षक एस. एस. सोळके यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मंगेश वाटाणे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, एम. जे. दंदे, आर. ए. दिघडे, डॉ. आर. डी. शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

दोन दिवस धरणे
उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांचे बैठकीतील वर्तन कर्मचारी संघाच्या जिव्हारी लागले आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवार आणि शनिवारी दुपारी 2 ते 2.30 तसेच सायंकाळी 6 वाजता कार्यालय सुटल्यानंतर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत.

वेतन आयोगाची रक्कम थकीत
सहाव्या वेतन आयोगाचा लाभ 1 मे 2010 पासून देण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. कर्मचारी/कामगार संघाने 2006 ते 2010 दरम्यानची थकबाकीची मागणी केली. यासाठी उपायुक्त रमेश मवाशी, मुख्य लेखापरीक्षक एस. एस. सोळंके यांची समिती गठित केली आहे. चार ऑक्टोबरपर्यंत अहवाल येणार आहे.

शुक्रवारी वेतन
महापालिकेतील तृतीयर्शेणी कर्मचार्‍यांचे वेतन शुक्रवारी (दि. 20) त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले. दुसर्‍या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात करण्याचे संकेत त्यांनी दिले.

वाद योग्य नाहीत
वाद योग्य नाहीत. दोन महिन्यांपासून वेतन थकलेल्या कर्मचार्‍यांच्या भावनांचा महापालिकेस आदर आहे. उत्पन्नात वाढ करून त्यावर मार्ग काढण्याचा जोरकस प्रयत्न केला जाणार आहे. अरुण डोंगरे, मनपा आयुक्त.

असंतोष निर्माण होईल
बैठकीतील वादावादीनंतर ‘उपायुक्त रामदास सिद्धभट्टी आणि मुख्य लेखापरीक्षक एस. एस. सोळंके हटाव’चा नारा कर्मचारी संघाने दिला आहे. आयुक्तांसमोरच उपायुक्तांची अशी वर्तणूक असेल, तर कर्मचार्‍यांची काय अवस्था असेल, याचा विचार करा. प्रल्हाद कोतवाल, सरचिटणीस, महापालिका कर्मचारी संघ.

आयुक्तांनी दिले आदेश
बैठकीत कर्मचारी संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे आयुक्तांनी परिपत्रक काढण्याचे आदेश दिले आहे.