आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Municipal, Latest News In Divya Marathi

महापालिकेत पुन्हा महिलाराज, खुल्या गटातील महिला सदस्यास मिळणार संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेत पुढील वर्षदेखील ‘महिलाराज’च राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला (ओपन) गटासाठी महापौर पदाचे आरक्षण निघाल्याने राजकीय पक्षातील महिलांमध्ये उत्साह निर्माण झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच बिघाडी झाल्यास महापौर म्हणून कोण विराजमान होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी असून, आगामी अडीच वर्षे राष्ट्रवादीला महापौरपद मिळणे अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रवादीत लोकसभा निवडणुकीत फूट पडल्याने महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. संजय खोडके राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचे सर्मथक महापौर पदाच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, यावरदेखील निवडणुकीचे यश अवलंबून आहे. काँग्रेस खोडके गटाला महत्त्व देणार, की राष्टवादी काँग्रेसला यावरदेखील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणात काँग्रेसनेदेखील महापौर पदाच्या निवडणुकीत उतरण्याची मानसिकता बनवली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी माजी महापौर असलेल्या नेत्याच्या रूपात काँग्रेसला आमागी महापौर दिसत होता. मात्र आरक्षणामुळे समीकरणदेखील बदलले असून, स्थितीला फायदा उठवल्यास काँग्रेसकडून वंदना कंगाले यांना पुन्हा महापौर पदाची संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. शिवाय ज्येष्ठ सदस्य डॉ. कांचन ग्रेसपुंजे, अर्चना इंगोले यांच्या नावांचा विचारदेखील होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जयर्शी मोरय्या, हमीदा बानो शेख अफजल चौधरी यांच्या नावांची चर्चा केली जात आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन खोडके गटाने सत्ता स्थापन केल्यास रिना नंदा, जयर्शी मोरे या महापौर पदाच्या प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीतील फुटीचा परिणाम स्थायी समिती सभापती निवडणुकीतच दिसून आला असता. त्या वेळी माजी सभापती सुगनचंद गुप्ता यांनी पुन्हा सभापतिपद मिळावे म्हणून मोर्चेबांधणी केली होती. मात्र, कॉँग्रेसमधील वरिष्ठ सदस्यांनी ही बंडाळी मोडून काढली होती. स्थायी समिती सभापती निवडणुकीप्रसंगी कॉँग्रेसला पद कायम ठेवता आले नाही. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये महापालिकेत आपलीच सत्ता कायम राहावी, असा प्रयत्न कॉँग्रेसकडून होण्याची अधिक शक्यता आहे.
महापौर पदाच्या आरक्षणामुळे महापालिकेतील राजकारणदेखील ढवळून निघणार आहे. सात सप्टेंबर रोजी विद्यमान महापौरांचा कार्यकाल संपणार असून, खर्‍या अर्थाने रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. संख्येने मोठय़ा असलेल्या पक्षातील वरिष्ठ सदस्य महापौर पदावर डोळा ठेवून असल्याने इच्छुकांची यादी लांबलचक झाली आहे. मात्र, यात कोण- कुणाला मदत करतो, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
खोडके गटाकडे लक्ष
आमदार रावसाहेब शेखावत व सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान होटल ग्रेस इन येथे आघाडीबाबत सूत्र ठरले होते. अडीच वर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगल्यानंतर खोडके गट महापौर पदावरून सहजासहजी दावा सोडणार नाहीत. खोडके गटातील चार नगरसेवकांविरोधात अपात्रतेचे प्रकरण सुरू आहे. यामुळे आता या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संजय खोडके यांचा गट कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक वादग्रस्त होण्याची शक्यता
आघाडीनुसार आगामी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महापौरपद येणार आहे. काँग्रेसची आघाडी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये फूट पडली आहे. खोडके तसेच आमदार राणा गटाने अद्याप अधिकृत नोंदणीबाबत कोणताही पुढाकार घेतला नाही. फ्रंटमधील सदस्य आपल्याकडेच असल्याची बतावणी होत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान सुनील काळे यांना गटनेते घोषित केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडील प्रकरणात बाजी मारली; मात्र प्रकरण उच्च् न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणाचा निकाल महापौर निवडणुकीपूर्वी लागल्यास त्याचा परिणामदेखील महापौरांच्या निवडीवर होण्याची अधिक शक्यता आहे. राजकीय उलथापालथीमुळे महापौर निवडणुकीत टशन होणार असल्याचे संकेत आहे.