आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘टशन’, काँग्रेसने राष्ट्रवादीला मदत केल्यास मोरय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आगामी महापौरपदासाठी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ‘टशन’ असल्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त झाले आहेत. निवडणूक वादातून आमदार रवि राणा आणि संजय खोडके गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादीला मदत केल्यास जयश्री मोरय्या, तर खोडके गटाला मदत केल्यास चरणजित कौर नंदा यांचे महापौर होणे निश्चित आहे, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून एकमेव शेख जफर शेख जब्बार यांचा अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. महापौर उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि ५) महापालिकेतील तुल्यबळ संख्याबळ असलेल्या राजकीय पक्षाकडून नामांकन दाखल करण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा लाभ काँग्रेस घेईल, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसकडून महापौर पदासाठी नामांकन दाखल करण्याची शक्यता होती. महापौर पदासाठी काँग्रेसकडूनदेखील अनेक दावेदार समोर आल्याने आघाडी धर्माचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नामांकन अर्ज सादर करण्यात आल्यानंतर महापौर पदाच्या शर्यतीत काँग्रेस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी आमदार रवि राणा संजय खोडके यांच्या गटादरम्यान धुमश्चक्री होणार असल्याचे राजकीय संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते पदाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनील काळे यांना दिलासा दिल्याने महापौर निवडणुकीमधील रंगत आणखी वाढली आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केल्यास खोडके गट भाजप शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून प्रस्ताव आल्यास भाजप, शिवसेना जनविकास-जनकल्याण, बसपा आदी पक्षांना एकत्र घेत खोडके गटानेदेखील सत्ता स्थापनेची आशा सोडलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेला महापौरपदासाठी मदत करीत खोडके गट पालिकेतील सत्ता कायम ठेवू शकते. असे झाल्यास उपमहापौर पददेखील काँग्रेसपासून हिसकले जाऊ शकते. महाविद्यालयीन निवडणुकीपासून संख्याबळ जुळवण्यात माहीर असलेले नेते खोडके गटाकडे आणि काँग्रेसकडे आहेत. मात्र, महापौर पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे मंगळवारीच स्पष्ट होईल.