आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकान बंद करण्‍यासाठी महिलांचे जिल्हाधिका-यांसमोर निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वडाळी भागातील देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी दारू दुकान हटाव कृती समितीच्या महिला पदाधिका-यांनी सोमवारी जिल्हाधिका-यांच्या दालनासमोरच तीव्र निदर्शने केली. ‘न्याय द्या.. न्याय द्या.. कलेक्टर साहेब, न्याय द्या... बाहेर या..’, ‘बंद करा.. बंद करा.. देशी दारू दुकान बंद करा...’ अशा घोषणा देण्यात आल्या. नियमानुसार पाच महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिका-यांच्या दालनात प्रवेश करून त्यांना आपली भूमिका समजावून सांगावी, असे पोलिस यंत्रणेचे म्हणणे होते. मात्र, जिल्हाधिका-यांनी सभागृहात बसून सर्वांसमक्ष आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा दालनाबाहेर येऊन आमचे गा-हाणे ऐकावे, असा आंदोलक महिलांचा आग्रह होता.


शेवटी दहा महिलांच्या प्रतिनिधी मंडळासोबत जिल्हाधिका-यांनी चर्चा करावी, असा मध्यम मार्ग निघाला. आंदोलकांमध्ये समितीच्या पदाधिकारी अनिता वानखडे, हर्षा राऊत, निशा चव्हाण, ललिता आंबेकर, पुष्पा गुहे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.


लवकरच चौकशी अहवाल : 16 फेब्रुवारीला झालेल्या मतदानादरम्यान मतदार यादी सदोष असल्याचे सिद्ध झाल्याने मतमोजणी रोखून धरण्यात आली होती. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसडीओ प्रवीण ठाकरे यांची एकसदस्यीय समिती नियुक्त झाली आहे. अमोल गोफणे या मतदार यादी विकत घेणा-या युवकाचे बयाणही त्यांनी नोंदवले आहे.
आठवडाभराची मुदत मागितली : कायदेशीर प्रक्रिया तपासल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. त्यामुळे ‘सात दिन तुम्हारे.. आठवा दिन हमारा’ म्हणत महिलांनी कार्यालय सोडले.


तासभर ठेवले ताटकळत
जिल्हाधिका-यांनी सर्वांसमक्ष बाजू ऐकावी, अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र, पोलिस यंत्रणा ऐकायला तयार नसल्याने महिलांना दालनासमोर तासभर ताटकळत उभे राहावे लागले.