आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Amravati Municipal Corporation, Lok Sabha Election

निवडणुकीत पैशांची होतेय गारपीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दोन वर्षांपूर्वी अमरावती महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना गाडगेनगर पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपये एका कारमधून जप्त केले होते. ही रक्कम ‘राजकीय’ असल्याचे त्यावेळी पुढे आले होते.
आता लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजले असतानाच पोलिसांनी गुरुवारी छत्तीसगढ राज्यातून आलेली 75 लाखांची रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम व्यवसायासाठी आणल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले असले, तरी ती निवडणुकीत वापरण्यासाठीच आल्याची चर्चा शहरात दिवसभर होती. अमरावतीत निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे पैशांची गारपीट झाल्याचा हा दुसरा अनुभव आहे.


ही रक्कम छत्तीसगढच्या राजनांदगाव येथील इंडियन अँग्रो अँड फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी राजू पद्माकर निकम (35), चंद्रप्रकाश मालवीय (42) आणि कारचालक मो. अन्वर इब्राहिम (39, तिघेही रा. नागपूर).. ..या तिघांना ताब्यात घेतले. ही रक्कम मारुती-सुझुकी रिट्झ (क्रमांक सीजी 08 के 397) या कारमधून शहरात आली. ही कारसुध्दा जप्त केली आहे. व्यवसायासाठी रक्कम आणल्याचे कारमधील व्यक्तींनी पोलिसांना सांगितले. वास्तविक, ही रक्कम व्यवसायासाठी आली, तर त्याचे सबळ पुरावे त्यांनी पोलिसांना का दिले नाही? व्यवसायाची रक्कम आहे, तर बँकेद्वारे हा व्यवहार का झाला नाही? असे अनेक प्रश्न पोलिसांसह सर्वसामान्यांपुढे उभे झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी मनपा निवडणुकीच्या वेळी शहरात आलेली रक्कम मध्यरात्रीच्या सुमारास पकडली गेली होती. ती रक्कम आणण्यासाठी वापरलेली कार महागडी होती. ती एका मोठय़ा राजकीय व्यक्तीची होती, असा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, अद्यापही या रकमेबाबत तर्क-वितर्कच लढवले जाताहेत. 25 महिन्यांनंतरही कोणत्याच पक्षाने त्या एक कोटीचे ‘पालकत्व’ स्वीकारले नाही. पर्यायाने अजूनही ती रक्कम शासनजमा असल्याची माहिती आहे. गुरुवारी पोलिसांनी पकडलेले 75 लाख 64 हजार 600 रुपयेदेखील निवडणुकीसाठीच आले असल्याची चर्चा आहे. या चर्चेला प्रथमदर्शनी पोलिसांनी दुजोरा दिलेला नसला, तरी कारमधील व्यक्तींकडून मिळालेली असमाधानकारक उत्तरे, ज्या व्यक्तीचे पत्र आहे त्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पत्ता, रक्कम वलगावनजीक कोणत्या गोदामाच्या व्यवस्थापकास दिली जाणार होती, तो व्यवस्थापक ही रक्कम कोणाला देणार होता, असे अनेक प्रश्न पोलिसांना भेडसावत आहेत. हे स्पष्ट झाल्याशिवाय रक्कम नेमकी कशासाठी आली, हे ठरवता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


चौकशी सुरू आहे
निवडणुकीसाठी ही रक्कम आली असल्याचे आतापर्यंत पुढे आले नाही. मात्र, आम्ही सर्व बाजूंनी याची चौकशी करीत आहोत. तसे काही आढळल्यास निश्चितच कारवाई केली जाईल. डॉ. सुरेशकुमार मेकला, आयुक्त.