आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Amravati Municipal Corporation Presented Budget

महापालिकेच्या पावणेसहाशे कोटींच्या बजेटवर मोहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महापालिकेच्या 2014-15 वर्षाच्या 576.85 कोटींच्या अर्थसंकल्पाला शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.स्थायी समितीने मंजूर केलेल्या 559.60 कोटींच्या अर्थसंकल्पात सर्वसाधारण सभेत 17.25 कोटींची भर टाकण्यात आली. प्रस्तावित मालमत्ता कर आणि व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भाड्यातून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वॉर्ड विकास आणि स्वेच्छा निधीत वाढ करण्यात आली असून, प्रत्येक नगरसेवकाला वर्षाकाठी 30 लाखांचा निधी मिळेल.


स्थायी समिती सभापती सुगनचंद गुप्ता यांनी त्यांच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीच्या तुलनेत महापालिकेच्या महसुली उत्पन्नात 119.69 कोटींची वाढ अपेक्षित करण्यात आली आहे. आर्थिक वर्षात मागील 35.53 कोटींच्या शिलकीसह मनपाला एकूण 326.17 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात 308.92 कोटींचे महसुली उत्पन्न अपेक्षित होते. मागील वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुलीत 16.38 कोटींची तूट आढळून आली. त्यामुळे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. नवीन इमारतींचे बांधकाम धडाक्यात सुरू असताना मालमत्ता कराचे उत्पन्न कमी दाखवले म्हणून सदस्यांनी आक्षेप नोंदवला.


वसुली लिपिक योग्य कर्तव्य बजावत नसल्याचा ठपका प्रशासनावर ठेवण्यात आला. त्यावर एमआयडीसीतील उद्योगांवर थकित 12.50 कोटींची कपात रक्कम गाळण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावर सांगोपांग चर्चेनंतर 17 कोटींची वाढ करण्याचा निर्णय झाला. मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची भाड्याची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकित असून, भाड्यातून मिळणार्‍या दीड कोटींच्या उत्पन्नात25 लाखांची वाढ सुचवण्यात आली. नगरसेवकांच्या वॉर्ड विकास आणि स्वेच्छा निधीत वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. वॉर्ड विकास निधी प्रतिनगरसेवक 15 लाखांहून 20 लाख, तर स्वेच्छा निधी सहा लाखांवरून 10 लाख रुपये करण्यात आला. यासह महिला व बाल कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली. महापौर वंदना कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत पक्षनेते बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, गटनेते अविनाश मार्डीकर, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, अजय गोंडाणे, वसंत साऊरकर, विलास इंगोले, चेतन पवार, तुषार भारतीय, अजय सामदेकर, प्रा. प्रदीप दंदे, रिना नंदा, मिलिंद बांबल, भूषण बनसोड, नीलिमा काळे, जयश्री मोरय्या, जावेद मेमन, भूषण बनसोड, अरुण जयस्वाल, डॉ. कांचन ग्रेसपुंजे, मो. इमरान मो. याकूब, डॉ. राजेंद तायडे, प्रा. सुजाता झाडे, जयश्री मोरे, बाळू भुयार, धीरज हिवसे, प्रदीप हिवसे, मो. हमीद शद्दा, निर्मला बोरकर यांनी चर्चेत भाग घेतला.


चर्चेत याला प्राधान्यक्रम : विशेष सभेत मालमत्ता कर, सिनेमा कर, स्थानिक संस्था कर, व्यापारी संकुल उत्पन्न, वडाळी व छत्री तलाव उत्पन्न, प्राथमिक शाळा भाडे उत्पन्न, माध्यमिक शाळा अनुदान, गुंतवणुकीवरील व्याज, स्मशान भूमी सुधारणा, पुतळा बसवणे, महापौर क्रीडा स्पर्धा, शिवटेकडी व भीमटेकडी संवर्धन, नागरिकांसाठी शौचालय सुविधा, दलित वस्ती सुधारणा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.