आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Amravati Revenue Division, Divya Marathi

अमरावती विभागात ‘महसूल’चा टक्का सुधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लोकसभा निवडणुकीमुळे अमरावती विभागातील महसुली उत्पन्न प्रभावित झाले आहे. 196.91 कोटी रुपयांचे उत्पन्न महसूल विभागाने शासनास प्राप्त करून दिले असून, निर्धारित उद्दिष्टापेक्षा ही टक्केवारी 90 इतकी आहे. विभागातील अकोला जिल्ह्याने शंभर टक्के वसुली प्राप्त करीत आघाडी घेतली, तर बुलडाणा व यवतमाळ जिल्हा उत्पन्नात माघारला आहे.


अमरावती विभागात 2013-14 या आर्थिक वर्षात 220 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्याचे लक्ष्य महसूल विभागाला देण्यात आले होते. मार्चअखेर 196.91 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त करीत लक्ष्याच्या अगदी जवळ महसूल विभाग पोहोचला आहे.


अकोला जिल्ह्याला 37.01 कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. 107.66 टक्केवारी प्राप्त करीत अकोला जिल्ह्याने 39.84 कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. त्याखालोखाल वाशीम जिल्ह्याने 25 कोटी रुपयांच्या लक्ष्याचा पाठलाग करीत 23.31 कोटींचा महसूल वसूल केला. त्याची टक्केवारी 93.28 आहे. मागील आर्थिक वर्षात 186.95 कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते, तर विभागाने 208.18 कोटी रुपयांचे महसूल प्राप्त केला होता. मार्च महिन्यामध्येच लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आणि दुसर्‍या टप्पात पश्चिम विदर्भात मतदान प्रक्रियादेखील पार पडली.


निवडणूक कार्याचा संपूर्ण भार महसूल विभागावर येत असल्याने उत्पन्नाचे लक्ष्य गाठताना कर्मचार्‍यांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. तथापि, निवडणुकीचे कामकाज सांभाळत 90 टक्के उत्पन्न प्राप्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांकडून झाले.


जिल्हास्तरावर जिल्हा कोषागार कार्यालयात आकड्यांचा ताळमेळ घेण्याची कार्यवाही सुरू असून, महसुली उत्पन्नामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतून अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर किती उत्पन्न मिळाले, हेदेखील स्पष्ट होईल.


महसूल विभागाकडून तीन प्रकारांमध्ये उत्पन्न प्राप्त केले जाते. त्यातील ‘अ’ प्रकारामध्ये जमीन महसूल, अकृषक कर, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतमार्फत कर प्राप्त होतो. ‘ब’ प्रकारामध्ये गौण खनिज, करमणूक कर आणि रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) कराचा समावेश आहे.


करमणूक करात वाढ
अमरावती विभागात करमणूक कराचे 14.56 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्चअखेर 15.17 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला. त्याची टक्केवारी 104 एवढी आहे. अकोला, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात करमणूक कर वसुलीत वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्याला 2.25 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, तर 3.07 कोटी रुपयांची वसुली करीत तब्बल 136.66 टक्केवारी गाठली. यवतमाळ जिल्ह्याने 2.51 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करून 106.23 टक्के म्हणजेच 2.66 कोटी रुपये प्राप्त केले. अकोला जिल्ह्याला 3.91 कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. जिल्ह्याने 104.32 टक्के वसुली करीत 4.07 कोटी रुपये मिळवलेत.


गौण खनिजात 59 कोटींचे उत्पन्न घटले
गौण खनिजाबाबत विभागात एकूण 59 कोटी रुपयांनी उत्पन्न घटले. 178 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 118.52 कोटी प्राप्त झाले. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्हा उत्पन्नात माघारला आहे. बुलडाण्याची टक्केवारी कमी 48.75 आहे. अकोला 70 टक्के, तर अमरावतीची टक्केवारी 63.42 टक्के.