आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Belora Airport Development

बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासाठी 20 कोटी मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बेलोरा विमानतळ विकासासाठी मंगळवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या विमानतळाचा विकास भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामार्फत (एअरपोर्ट अथॉरिटी) करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता.


विमानतळासाठी संपादित करण्यात आलेली 336 हेक्टर जमीन एअरपोर्ट अथॉरिटीला देण्यात येणार आहे. प्राधिकरण स्वखर्चातून तीन वर्षांच्या कालावधीत हे विमानतळ विकसित करणार आहे.
विमानतळावर नाइट लँडिंग, टॅक्सी-वे या सुविधाही राहणार आहेत. धावपट्टीचा विस्तार दोन हजार 500 मीटरपर्यंत करण्यात येणार असून, राज्य शासनाचे विमान, हेलिकॉप्टर, हेलिअँम्ब्युलन्स आणि इर्मजन्सी ऑपरेशन म्हणून विमाने व हेलिकॉप्टर विमानतळावर उतरवताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. विमानतळासाठी दिलेल्या जमिनीचा कुठलाही अन्य वाणिज्यिक वापर केला जाणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. ही जमीन प्राधिकरणास 60 वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा एक लाख रुपये भूभाड्याने देण्यात आली आहे.
बडनेरा-यवतमाळ बाह्य वळण रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापासून विमानतळास जोडणारा चारपदरी रस्ता, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी तसेच विमानतळासाठी आवश्यक विद्युत जोडणी व पाणीपुरवठा या कामांसाठी 34 कोटींचा निधी खर्च करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला होता.


उद्योजकांच्या आशा झाल्या पल्लवित
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने अमरावतीकर उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नाइट लॅँडिंग सुरू होणार असल्याने राज्यातील व्यापार तसेच उद्योग वाढीसाठी अमरावतीतील उद्योजकांना प्रयत्न करणे सोपे होणार असून, आमदार शेखावत यांच्या प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली आहे.