आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - चार दिवसांपूर्वी अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर पोलिसांनी एका कारमधून आलेली 75 लाखांची रोकड व कार जप्त केली. ती कार परत मिळावी म्हणून कंपनीकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या मागणीसाठी गाडगेनगर पोलिसांनाही अर्जाची प्रत देण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून रिट्झ कारमध्ये (क्रमांक सीजी 08 के 397) शहरात 75 लाख रुपये येत होते. शहरात पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी कारसह ती रक्कम जप्त केली. याचवेळी पोलिसांनी राजू पद्माकर निकम (35), चंद्रप्रकाश मालवीय (42) आणि कारचालक मो. अन्वर इब्राहिम (39, तिघेही रा. नागपूर) यांना ताब्यात घेतले होते. ही रक्कम राजनांदगाव येथील इंडियन अँग्रो अँड फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची असल्याचे सांगण्यात आले आहे. ही रक्कम मारुती सुझुकी रिट्झमधून येत होती. शनिवारी या कंपनीच्या प्रतिनिधीने येथील न्यायालयात कार परत मिळण्यासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनाही त्यांनी अर्जाची प्रत दिली आहे.
याचवेळी तपासाचा महत्त्वाचा भाग म्हणून राजनांदगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गाडगेनगर पोलिसांनी पत्राद्वारा या रकमेबाबत विचारणा केली आहे. ही रक्कम देतेवेळी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, अशी विचारणाही करण्यात आली आहे. या कंपनीने ही रक्कम व्यवसायासाठी अमरावतीत पाठवल्याचे सांगितले आहे. मात्र, न्यायालयात कारच्या सुटकेसाठी अर्ज केला, मात्र रक्कम परत करावी, असा अर्ज कंपनीकडून न आल्यामुळे त्या रकमेबाबतचे गौडबंगाल वाढले आहे. गाडगेनगर पोलिसांचे पथक लवकरच राजनांदगाव येथे जाणार आहे. त्या ठिकाणाहून रकमेबाबत आणखी काही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.
कार परतीचा अर्ज
या कंपनीच्या प्रतिनिधीने जप्त असलेली कार परत मिळण्यासाठी न्यायालयाला अर्ज केला असून, आम्हालाही अर्जाची प्रत मिळाली आहे. याचवेळी आम्ही राजनांदगावच्या बँक ऑफ इंडियाला रकमेबाबत विचारणा केली आहे. अद्याप रकमेचे कोडे उकललेले नाही. दीपक कुरुलकर, ठाणेदार, गाडगेनगर.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.